( चिपळूण / निलेश कोकमकर )
चिपळूण तालुक्यातील कळंबट गावातील सडेवाडी येथील युवकांनी एकत्र येत मुंबईत प्रथमच आयोजित केलेली ‘शिववैभव चषक २०२६’ भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा रविवार, चर्चगेट येथील ओव्हल मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे आयोजन शिववैभव क्रिकेट संघ (सडेवाडी) यांच्या वतीने करण्यात आले होते.
स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग नोंदवला होता. प्रत्येक सामना २ ते ३ षटकांचा ठेवण्यात आला असून सर्व सामने क्रीडास्पर्धेच्या भावनेत आणि आनंदी वातावरणात खेळवण्यात आले. अंतिम निकालात भराडेवाडी क्रिकेट संघ, राजापूर यांनी प्रथम क्रमांक पटकावत चषक व रोख पारितोषिक मिळवले. श्री गणेश कृपा क्रिकेट संघ, कुडूकवाडी यांनी द्वितीय क्रमांक, जय हनुमान क्रिकेट संघ, मुर्तवडे देणवाडी यांनी तृतीय, तर चंडिका क्रिकेट संघ, केरे यांनी चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. वैयक्तिक कामगिरीत भराडेवाडी संघाचा केतन उत्कृष्ट गोलंदाज, तर नितेश उत्कृष्ट फलंदाज ठरला.
या स्पर्धेसाठी विविध मान्यवर व ग्रामस्थांकडून स्वेच्छेने देणगी स्वरूपात सहकार्य लाभले. प्रथम चषक कै. महादेव सोमा कोकमकर यांच्या स्मरणार्थ श्री. चंद्रकांत कोकमकर (अध्यक्ष, कुणबी समाजोन्नती संघ, चिपळूण शाखा) यांच्या वतीने देण्यात आला. द्वितीय चषक कु. प्रितम महेश वीर (कळंबट), तृतीय चषक कु. श्रीनाथ सावित्री सीताराम केंबळे (केरे) आणि चतुर्थ चषक सायली व परी प्रदीप घाणेकर (कळंबट) यांच्या वतीने प्रदान करण्यात आला.
उत्कृष्ट फलंदाज चषक रुही दीपक बारगोडे (घवाळवाडी), उत्कृष्ट गोलंदाज चषक नरेश बबन घाडे (गुहागर) यांना देण्यात आला. YK Sports (रमेश दादा कोकमकर) यांनी टी-शर्ट्स, तर इतर सहकार्यांमध्ये चेंडू, नाश्ता, पदके व मैदान व्यवस्थेसाठी विविध व्यक्ती व संघांचे मोलाचे योगदान लाभले.
शिववैभव क्रिकेट संघाचे कर्णधार नितेश कोकमकर यांच्यासह संघातील सर्व खेळाडू, आयोजक आणि सहकाऱ्यांच्या परिश्रमामुळे तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत ही स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाली.

