(रत्नागिरी /प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी दक्षिण युवा मोर्चाच्या शहर कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा १६ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. यामध्ये अमृत अंकुश गोरे यांची रत्नागिरी शहर उपशहराध्यक्षपदी, तर चिन्मय सुरेश प्रभू यांची शहर सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रत्नागिरी शहरप्रमुख दादा ढेकणे आणि युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अजिंक्य केसरकर यांच्या आदेशानुसार ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. या नियुक्त्यांच्या माध्यमातून युवा मोर्चाच्या शहरातील संघटनात्मक रचनेला नवे पदाधिकारी जोडण्यात आले आहेत. या वेळी जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, महाराष्ट्र युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विक्रांत जैन, सचिव अद्वैत कुलकर्णी, शहर सरचिटणीस निलेश आखाडे, नगरसेवक नितीन जाधव, मनोज पाटणकर, जिल्हा महिला मोर्चाच्या वर्षा ढेकणे यांच्यासह शहरातील उपाध्यक्ष, नगरसेवक, बूथप्रमुख, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
युवा मोर्चाच्या माध्यमातून पक्षाचे संघटनात्मक कार्य अधिक व्यापक करणे, युवकांना पक्षाच्या विचारप्रवाहाशी जोडणे आणि शहरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये तरुणांचा सक्रिय सहभाग वाढविणे, अशी अपेक्षा या नियुक्त्यांमागे व्यक्त करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


