(चिपळूण / प्रतिनिधी)
१५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाच्या सहकाऱ्याला जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सावर्डे येथील पोलिस उपनिरीक्षकाच्या सांगण्यावरून लाच स्वीकारताना संबंधित खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने सापळा रचून पकडले होते.
मयताच्या वारसदारांना विमा रक्कम मिळविण्यासाठी क्लेम ट्रिब्युनल न्यायालयात दावा दाखल करावयाचा होता. त्या प्रक्रियेसाठी अपघातग्रस्त वाहनाचा आरटीओ तपासणी अहवाल व डीओआर फॉर्म देण्याच्या बदल्यात सावर्डे येथील पोलिस उपनिरीक्षक मनीष कांबळे यांनी तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर, खासगी व्यक्ती अभिजित प्रकाश शिर्के (रा. चिपळूण) यांना पंचांसमक्ष तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात बुधवारी चिपळूण जिल्हा न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शिर्के यांचा जामीन अर्ज मंजूर केला.
शिर्के यांच्या वतीने ॲड. ऋषिकेश थरवळ आणि ॲड. सोहम भोजने यांनी काम पाहिले. दरम्यान, या कारवाईमुळे तालुक्यातील पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.

