( चिपळूण / वार्ताहर )
मौजे उमरोली येथील भडवळकरवाडी परिसरात शेतातील ४० फूट खोल विहिरीत पडलेल्या दुर्मिळ काळ्या बिबट्याला चिपळूण वन विभागाच्या बचाव पथकाने सुरक्षितपणे बाहेर काढले. आज (मंगळवारी, दि. १७ नोव्हेंबर) रोजी सकाळी घडलेल्या या घटनेनंतर वन विभागाच्या पथकाने तातडीने बचावमोहीम राबवली. सुटका करण्यात आलेली बिबट्याची मादी अंदाजे एक वर्ष वयाची असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
भडवळकरवाडी येथील विष्णू अर्जुन भडवळकर यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याचे ग्रामपंचायत सदस्य योगेश खांडेकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत वनरक्षक राहुल गुंठे यांना कळवले. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे अधिकारी आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर आवश्यक बचावकार्य करून बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
सुटकेनंतर बिबट्याची पाहणी केली असता ती अंदाजे एक वर्ष वयाची मादी असल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपासणीसाठी तिला शासकीय वाहनातून चिपळूण येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयात नेण्यात आले. तेथे पशुवैद्यकीय तपासणी करण्यात आली. बिबट्या सुस्थितीत असल्याची खात्री पटल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.
मुख्य वनसंरक्षक श्रीलक्ष्मी, विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही बचावमोहीम यशस्वी करण्यात आली.
या मोहिमेत वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक कृष्णा इरमले, वनरक्षक राहुल गुंठे, बचाव पथकातील अजय बडदे आणि अथर्व घाग, वाहनचालक नंदकुमार कदम तसेच लिपिक शहेनशहा कलावंत यांनी सहभाग घेतला. ग्रामपंचायत सदस्य योगेश खांडेकर आणि स्थानिक ग्रामस्थांनीही बचावकार्यात सहकार्य केले.
दरम्यान, वन्यप्राणी संकटात किंवा अडचणीत आढळल्यास नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, स्वतःहून त्यांना हाताळण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी तातडीने वन विभागाशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.


