(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
मिऱ्या नागपूर महामार्गावर विरुद्ध दिशेने दुचाकी चालवून स्वतःसह अन्य वाहनचालकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या तीन दुचाकीस्वारांविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. कुवारबाव ते कांचन हॉटेल आणि आरटीओ नाका परिसरात रविवारी (१५ नोव्हेंबर) सायंकाळी वेगवेगळ्या वेळी हे प्रकार घडले. महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण करून अपघाताचा धोका वाढविल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय मनाई भाई (वय ६०, रा. गणेश कॉलनी, टीआरपी, रत्नागिरी), चिंतन भरण पटेल (वय २४, रा. टीआरपी, रत्नागिरी) आणि अब्बास बादशहा पठाण (वय ५९, रा. पानवल, जुगाईनगर, रत्नागिरी) हे तिघेही महामार्गावरून विरुद्ध दिशेने दुचाकी चालविताना आढळून आले. रविवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास अजय भाई हे कुवारबाव येथील महामार्गावरून विरुद्ध दिशेने दुचाकी चालवत होते. त्यानंतर साडेसहाच्या सुमारास चिंतन पटेल हेही त्याच प्रकारे दुचाकी चालविताना निदर्शनास आले. तसेच अब्बास पठाण हे कांचन हॉटेल ते आरटीओ नाका दरम्यान महामार्गावर विरुद्ध दिशेने दुचाकी चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
महामार्गावर वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या विरुद्ध दिशेने दुचाकी चालविण्यामुळे अन्य वाहनचालकांना अचानक वाहने वळवावी लागण्याची किंवा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील आणि बाजीराव कदम यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या. त्यानुसार तिन्ही दुचाकीस्वारांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. दरम्यान, महामार्गावर विरुद्ध दिशेने वाहन चालविणे ही केवळ वाहतूक नियमांची पायमल्ली नसून अन्य प्रवाशांच्या सुरक्षिततेलाही गंभीर धोका निर्माण करणारी बाब आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे.


