(मुंबई / वृत्तसंस्था)
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांना लक्ष्य करण्याची धमकी गँगस्टर गोल्डी ढिल्लोन याने दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने बच्चन पिता-पुत्रांना जीवे मारण्याचा इशारा दिल्याने बॉलिवूडसह सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले असून, सुरक्षेच्या दृष्टीने हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील ‘जलसा’ निवासस्थानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी काही दिवसांपूर्वी देण्यात आली होती. त्याचबरोबर त्यांच्या घराबाहेर गोळीबार करण्याचा कटही रचण्यात आल्याचे समोर आले होते. या प्रकरणाचा तपास करताना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मुंबईतून विकास ठाकूर आणि दीपक सिंह या दोन संशयित शूटर्सना अटक केली होती. या दोघांचा संबंध बिष्णोई गँगशी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, या अटकेनंतर गोल्डी ढिल्लोन याने फेसबुकवर पोस्ट प्रसिद्ध करून या कटाची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला असून, बच्चन पिता-पुत्रांना थेट धमकी दिली आहे.
या पोस्टमध्ये गोल्डी ढिल्लोनने अटक करण्यात आलेल्या विकास ठाकूर आणि दीपक सिंह यांचा संबंध अन्य कोणत्याही गँगशी जोडू नये, असे म्हटले आहे. या दोघांना अटक झाली असली तरी आपला कट उधळलेला नाही, असा दावा करत मुंबईत आणखी २०० जण तयार असल्याचे त्याने नमूद केले आहे. शीख समाजाविरोधात वक्तव्य करणाऱ्यांना शत्रू मानले जाईल, असा इशाराही त्याने दिला आहे. संबंधित व्यक्तींनी कितीही बुलेटप्रूफ केबिन तयार केल्या, तरी त्यामध्ये घुसून हल्ला करू, अशी धमकीही या पोस्टमधून देण्यात आली आहे.
दरम्यान, अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर त्याच संशयित आरोपींनी अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याची रेकी केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली होती. अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानाबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी होत असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गोल्डी ढिल्लोनच्या नावाने प्रसारित झालेली ही धमकीची पोस्ट नेमकी कोठून आणि कोणी केली, याचा शोध सायबर पोलिसांकडून घेतला जात आहे. या प्रकरणाची सखोल तपासणी सुरू असून, टायगर श्रॉफ आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर आणखी कोणता बॉलिवूड कलाकार गँगस्टरच्या निशाण्यावर आहे, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.


