(धाराशिव / वृत्तसंस्था)
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील व्हंताळ गावच्या राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू अश्विनी तानाजी मोहिते, विवाहानंतर अश्विनी मनोहर पौळ, यांनी ३ सप्टेंबर २०२६ रोजी आपल्या तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरील उपळी बुरुजावरून उडी घेतल्याच्या अत्यंत दुर्दैवी घटनेला आता वेगळे वळण मिळाले आहे. या घटनेत अश्विनी आणि त्यांचा मुलगा अजिंक्य यांचा मृत्यू झाला. जुळ्या मुलींमधील क्रांती हिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, वीरा गंभीर जखमी आहे.
दरम्यान, अश्विनी यांच्या वडिलांनी पती मनोहर पौळ आणि सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत त्यानंतर त्यांच्या पतीकडून त्यांच्यावर संशय घेतला जाऊ लागला, तू एवढा वेळ बाहेर राहत जाऊ नको, तू नोकरीच्या नावाखाली कुठे जातेस, असं म्हणत त्यांच्या पतीकडून सातत्याने संशय व्यक्त करण्यात येत होता. अश्विनी या गोष्टी आम्हाला फोनवरून सांगत होत्या, असं एफआयआरमध्ये अश्विनी यांच्या माहेरच्या लोकांनी म्हटलं आहे.
लग्नात हुंडा कमी दिला तसेच ऑटो रिक्षा घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये, या कारणावरून अश्विनी यांना सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी केला आहे. सासरच्या लोकांकडून होत असलेल्या सततच्या जाचाला कंटाळूनच अश्विनी यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा त्यांच्या वडिलांनी केला आहे. या आरोपांची पोलिसांकडून पडताळणी सुरू असून, या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
अश्विनी पौळ या कुस्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील विविध कुस्ती स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. २००७ मध्ये तिरुवनंतपुरम येथे, तसेच २००८ आणि २००९ मधील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी एकूण ५ सुवर्ण आणि ६ रौप्य पदके जिंकली होती. त्यांच्या कुटुंबातही कुस्तीची परंपरा असून, वडिलांनी मुलीच्या सरावासाठी घरातच तालीम सुरू केली होती.
क्रीडा क्षेत्रातील यशासोबतच अश्विनी या मुंबईतील महाराष्ट्र सुरक्षा दलात (MSF) कार्यरत होत्या. पती मनोहर पौळ यांच्या सांगण्यावरून त्यांनी चार ते पाच महिन्यांपूर्वी नोकरीचा राजीनामा दिला होता. मागील तीन महिन्यांपासून त्या आपल्या तीन मुलांसह माहेरी राहत होत्या. याच पार्श्वभूमीवर माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
३ सप्टेंबर रोजी अश्विनी पौळ या दुपारी दीडच्या सुमारास मुलगा अजिंक्य आणि जुळ्या मुली स्वरा व क्रांती यांच्यासह नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्यासोबत केकही होता. किल्ल्यातील शिपायाने किल्ल्याच्या परिसरात वाढदिवस साजरा करण्यास मनाई केल्यानंतर अश्विनी यांनी किल्ल्याबाहेर केक कापला आणि मुलांना चॉकलेट दिले. त्यानंतर त्या मुलांसह किल्ल्यातील सुमारे शंभर फूट उंच असलेल्या उपळी बुरुजावर गेल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला अश्विनी यांनी मुलगा अजिंक्य याला बुरुजावरून खाली ढकलले आणि त्यानंतर स्वतः उडी घेतली. त्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलींनीही पाठीमागून उड्या घेतल्या. या घटनेत अश्विनी आणि अजिंक्य गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या दोन्ही मुलींना धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री साडेबारा वाजता क्रांती हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर स्वरा ही मृत्यूशी झुंज देत आहे.
या प्रकरणात अश्विनी पौळ यांचे पती मनोहर अंकुश पौळ, सासू कालिंदा पौळ, सासरा अंकुश पौळ आणि पतीची आत्या विमलाबाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सासरच्या लोकांकडून सातत्याने अश्विनी पौळ यांचा छळ सुरू होता, असं तक्रारीमध्ये म्हटलं आहे. या एफआयआरमधून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
अश्विनी यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण काय, सासरच्या मंडळींकडून खरोखरच त्यांचा छळ झाला होता का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. वडिलांनी केलेल्या आरोपांचीही चौकशी केली जात आहे. त्यामुळे तपासातून या घटनेमागील सत्य समोर येण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एका कर्तृत्ववान महिला कुस्तीपटूचा आणि तिच्या तीन चिमुकल्या मुलांचा झालेला हा दुर्दैवी अंत क्रीडा क्षेत्रासह सर्वत्र हळहळ व्यक्त करणारा ठरला आहे. या घटनेमुळे कौटुंबिक संघर्ष, मानसिक तणाव आणि महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

