(गुहागर / वार्ताहर)
महिलांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्या आनंदाचा आणि सन्मानाचा उत्सव ठरलेला ‘खेळ पैठणीचा… सन्मान होम मिनिस्टरचा’ हा भव्य कार्यक्रम पाटपन्हाळे-शृंगारतळी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पारमी प्रोडक्शन, मुंबई आणि गुहागर तालुका कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी ग्रामपंचायत पाटपन्हाळे येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला रसिक प्रेक्षक, मान्यवर आणि सहभागी महिलांसह सुमारे १५० जण उपस्थित होते. तब्बल ५० महिलांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादनाने झाली. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करण्यात आले. धम्मपद एक धम्मदेशना प्रबोधन वाद्यवृंद, मुंबईचे गायक योगेश यशवंत पवार आणि पंचशील गायन पार्टी, तळवली/मुंबईचे गायक अमित भागुराम पवार यांनी सुरेल गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.
यानंतर मुख्य ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाला सुरुवात झाली. विविध मनोरंजक खेळ, उखाणे, गाणी आणि सामाजिक तसेच विनोदी प्रश्नमंजुषेमध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रश्नांची योग्य उत्तरे देणाऱ्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते तत्काळ आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली. प्रत्येक स्पर्धेत महिलांचा आत्मविश्वास आणि उत्साह दिसून येत होता. उपस्थित रसिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
या सोहळ्यात गुहागर तालुक्यातील स्थानिक कलाकारांनीही आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. कु. आर्वी रसिका उज्वल पवार हिने आपल्या गोड आवाजात सुरेल कलाकृती सादर केली. संपर्कप्रमुख व प्रतिनिधी विलास सोलकर यांनी विविध कलाकारांच्या आवाजांची नक्कल, विनोदी मिमिक्री आणि जादूचे प्रयोग सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. कवी धीरज शांताराम पवार यांनी स्वरचित कविता सादर केली, तर कु. पारमी दिपाली रविंद्र पवार हिने धीरज पवार लिखित कार्यक्रमाच्या विषयावरील कविता सादर केली. सर्व कलाकारांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मान सौ. सायली प्रमोद शिरगावकर (जाणवळे) यांनी पटकावला. त्यांना मानाची पैठणी, सन्मानचिन्ह, भारतीय संविधान ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या सौ. मनीषा महेंद्र जाधव (त्रिशूळ-साखरी) यांना मानाची पैठणी, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
विशेष आकर्षक बक्षिसांच्या मानकरी म्हणून सौ. मीनल कदम (आबलोली), संजीवनी पागडे, रूपांजली पवार, अंकिता सावंत, संजीवनी दयाळकर, पवित्रा शिरगावकर आणि हेमांगिनी सुधीर चरकरे यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आयु. आनंद डी. पवार, आयु. प्रभाकर गणू पवार, आयु. सुनील गोविंद पवार, माजी सैनिक व सामाजिक कार्यकर्ते आयु. सुनील जाधव, रिगल कॉलेज, शृंगारतळीचे अध्यक्ष आयु. महेंद्र कदम, आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित आयु. सखाराम लक्ष्मण पवार आणि पत्रकार आयु. संदेश कदम उपस्थित होते. यांच्यासह निर्माती दिपाली रविंद्र पवार, युवा कार्यकर्ता राकेश हरिश्चंद्र पवार, प्रतीक जाधव, रोहित पवार, वनिता भागुराम पवार, रोहिणी अनंत पवार, सुगंधा दामोदर पवार, सुषमा रमेश पवार, रसिका पवार, मोहिते मॅडम आणि कदम ताई यांची उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या महिला, विशेष बक्षीस विजेत्या, देणगीदार आणि जाहिरातदार यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
आयोजनातील विशेष कामगिरीबद्दल सचिन केशव पवार यांना विशेष सन्मान, तर आयोजनासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल उज्वल जनार्दन पवार यांना विशेष योगदान सन्मान प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संपर्कप्रमुख व प्रतिनिधी विलास सोलकर, प्रशांत भेकरे, संतोष भेकरे, उज्वल पवार, धीरज पवार आणि सचिन पवार यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले.
समारोपप्रसंगी गुहागर तालुका कला मंचाचे संस्थापक, अध्यक्ष व संचालक रविंद्र रोहिणी अनंत पवार यांनी भविष्यातील सांस्कृतिक उपक्रमांची दिशा स्पष्ट केली. गुहागर तालुक्यातील सर्व समाजांतील कलाकारांना एकत्र आणून त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हायस्कूल व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कलाकार घडविण्यासाठी विनामूल्य मार्गदर्शन करणे, नवोदित कलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणे आणि भविष्यात भव्य कला महोत्सव आयोजित करणे, असा मंचाचा मानस त्यांनी व्यक्त केला.
‘ग्रामीण कलेला कला मंच, कलावंतांना संधी आणि कलेतून रोजगार’ हे ध्येय समोर ठेवून गुहागर तालुक्यातील कलाक्षेत्राला नवी दिशा देण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या उपक्रमासाठी आर्थिक, जाहिरात, कलात्मक आणि प्रत्यक्ष उपस्थितीच्या माध्यमातून सहकार्य करणारे देणगीदार, जाहिरातदार, मान्यवर, कलाकार, संपर्कप्रमुख, कार्यकर्ते, सहभागी महिला आणि रसिक प्रेक्षक या सर्वांचे पारमी प्रोडक्शन, मुंबई आणि गुहागर तालुका कला मंचाच्या वतीने संस्थापक, अध्यक्ष व संचालक रविंद्र रोहिणी अनंत पवार यांनी मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमाची सांगता झाली असली, तरी या सोहळ्याने निर्माण केलेल्या आनंददायी आठवणी आणि सांस्कृतिक चळवळीला मिळालेली नवी ऊर्जा उपस्थितांच्या मनात कायम राहिली.


