(राजापूर /रत्नागिरी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गंगातीर्थ बसथांब्याजवळ स्पीडब्रेकरवरून जात असताना भरधाव महिंद्रा एक्सयूव्ही ५०० गाडीने मारुती इर्टिगाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. अपघाताबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या इर्टिगा चालकाच्या भावाला संबंधित वाहनचालकाने आरेरावी करीत धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गुजरातमधील २४ वर्षीय तरुणाविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमेश वीरकुमार कुंटे (वय ४९, रा. टिंगरेनगर, पुणे) हे आपले भाऊ राकेश वीरकुमार कुंटे, त्यांची पत्नी दर्शना, मुलगी गार्गी आणि मुलगा वीर यांच्यासह मारुती इर्टिगा (क्रमांक MH 12 TY 4059) या गाडीने प्रवास करीत होते. तारकर्ली येथील ब्ल्यू सी रिसॉर्ट येथून १५ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता पुण्याकडे जाण्यासाठी ते निघाले होते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास सुरू असताना सकाळी ७.१५ ते ७.३० वाजण्याच्या दरम्यान राजापूर येथील गंगातीर्थ बसथांब्याजवळील स्पीडब्रेकरवर त्यांच्या गाडीला पाठीमागून महिंद्रा कंपनीच्या एक्सयूव्ही ५०० (क्रमांक MH 01 BU 4759) या गाडीने जोरदार धडक दिली. गुजरातमधील सुरत येथील यश भारतभाई वाघानी (वय २४) हा संबंधित वाहन चालवत होता. त्याने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता अतिवेगाने वाहन चालवून धडक दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. अपघातानंतर राकेश कुंटे हे संबंधित चालकाला जाब विचारण्यासाठी गेले असता, त्याने आरेरावी करीत त्यांना धक्काबुक्की केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे वाहनांचे नुकसान करण्यासोबतच अपघातानंतरच्या वादाचेही प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. याप्रकरणी उमेश कुंटे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार यश भारतभाई वाघानी याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, ११५(२) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करीत आहेत.


