( मुंबई )
महागाईचा फटका आता सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावरही दिसू लागला आहे. मुंबईतील सलून आणि ब्युटी पार्लर सेवांच्या दरात 20 टक्क्यांची वाढ करण्यात आली असून, केस कापणे, दाढी, फेशियल, हेअर कलर यांसारख्या सेवांसाठी ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. सलून ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन या दरवाढीची घोषणा करण्यात आली.
असोसिएशनच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. विशेषतः मुंबईतील सलून व्यवसायिकांना वाढत्या खर्चाचा मोठा फटका बसत असल्याने दरवाढ अपरिहार्य असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले. यापूर्वी महाराष्ट्र नाभिक महामंडळानेही दरवाढ जाहीर केली होती. याबाबत बोलताना सलून ब्युटी पार्लर असोसिएशनचे मुंबई अध्यक्ष तुषार चव्हाण यांनी सांगितले की, “महागाईमुळे व्यवसाय चालवणे कठीण होत आहे. सलूनसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे 20 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
मुंबईतील विविध भागांमध्ये सलून सेवांचे दर वेगवेगळे असल्याचेही त्यांनी सांगितले. “काही ठिकाणी केस कापण्यासाठी 100 रुपये तर काही भागांत 300 रुपये आकारले जातात. त्यामुळे परिसर आणि सुविधेनुसार दरवाढ लागू होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सलून व्यवसायासाठी लागणारे शॅम्पू, हेअर कलर, ब्लीच, फेशियल क्रीम, जेल, वॅक्स, डिस्पोजेबल साहित्य, टॉवेल धुण्याचे साहित्य तसेच निर्जंतुकीकरणासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. पेट्रो-केमिकल उद्योगाशी संबंधित या वस्तूंवर इंधन दरवाढीचा थेट परिणाम झाल्याने व्यवसायाचा खर्च वाढल्याचे असोसिएशनने सांगितले.
“ग्राहकांना परवडावे म्हणून अनेक व्यावसायिकांनी आतापर्यंत स्वतःचा नफा कमी करून सेवा दिल्या. मात्र आता भाववाढीशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही,” असे असोसिएशनचे प्रतिनिधी कपिल चव्हाण यांनी नमूद केले. दरम्यान, सलून सेवांच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्य जनतेच्या मासिक खर्चात आणखी वाढ होणार आहे.

