(रत्नागिरी /प्रतिनिधी)
दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी कोकणात पर्यटकांचा महापूर लोटला असतानाच, रत्नागिरी जिल्ह्यात सीएनजी (नैसर्गिक वायू) इंधनाचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात इंधनाचा ‘ठणठणाट’ झाल्याने रत्नागिरी शहरासह चिपळूण, खेड, लांजा आणि पाली परिसरातील सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी तर तब्बल दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा पाहायला मिळत असून, पर्यटकांसह स्थानिक वाहनचालकांचे अतोनात हाल होत आहेत.
दिवाळीनिमित्त कोकण किनारपट्टीवर मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. परिणामी, इंधनाची मागणी अचानक वाढली आहे. मात्र, वाढत्या मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा पडत असल्याने रत्नागिरीतील माळनाका, एमआयडीसी (जे. के. फाईल्स परिसर), हातखंबा आणि नाचणे येथील सीएनजी पंपांवर गॅस भरण्यासाठी वाहनचालकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. या इंधन टंचाईचा सर्वाधिक फटका स्थानिक रिक्षाचालक आणि व्यावसायिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना बसत आहे. सणासुदीच्या दिवसांत पर्यटकांची वर्दळ असल्याने चांगला व्यवसाय होण्याची अपेक्षा असताना, या चालकांचा बहुतांश वेळ प्रवासी वाहतुकीऐवजी पंपावरील रांगेतच खर्ची पडत आहे. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन, सीएनजीचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचे पूर्वनियोजन करण्यात प्रशासन आणि गॅस पुरवठादार कंपन्यांना अपयश आल्याची भावना वाहनचालकांमधून व्यक्त होत आहे. “गॅस भरण्यासाठी आम्हाला तब्बल दोन ते अडीच तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. सुट्ट्यांच्या हंगामात प्रशासनाने पुरवठ्याचे योग्य नियोजन करणे अपेक्षित होते. या प्रकारामुळे प्रवाशांचे आणि आमचेही मोठे नुकसान होत आहे.” अशी प्रतिक्रिया एका वाहनचालकाने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिली आहे. जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी आणि पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून सीएनजी पुरवठा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.


