(लांजा / वार्ताहर)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आंजणारी घाटात आज दुपारी दोन कारचा अपघात झाला. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मारुती स्विफ्ट कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने पुढे जाणाऱ्या व्होक्सवॅगन पोलो कारला पाठीमागून धडक दिली. दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातात सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध श्रीकृष्ण गुणे (वय ४३, रा. मठ कडुवाडी, ता. लांजा) हे आपल्या ताब्यातील व्होक्सवॅगन पोलो (क्रमांक एमएच.०८.एएन.१८१९) या कारमधून आईला घेऊन लांज्याच्या दिशेने जात होते. आंजणारी एसटी थांब्याच्या खालच्या बाजूला घाटातील तीव्र उतारावर त्यांची कार असताना पाठीमागून आलेल्या मारुती स्विफ्टने जोरदार धडक दिली.
अतिमट्टू वाडेखेतील गोपाकुमार (वय ५०, रा. पुणे, वडगाव बुद्रुक) हे एमएच.१५.जीएक्स.०७८० क्रमांकाची स्विफ्ट कार घेऊन गोव्याच्या दिशेने जात होते. घाटातील उतारावर त्यांच्या कारवरील नियंत्रण सुटल्याने समोरून नव्हे, तर पुढे जात असलेल्या पोलो कारला पाठीमागून धडक बसली.
या अपघातात स्विफ्ट कारचे चालक अतिमट्टू गोपाकुमार यांच्या मानेला किरकोळ दुखापत झाली. अन्य कोणतीही जीवितहानी झाली नसून दोन्ही कारचे नुकसान झाले आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.


