(मुंबई)
राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी होत असताना जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, सर्वांचे लक्ष लागले आहे ते मुंबई महापालिकेकडे. तब्बल आठ वर्षांनंतर होणारी ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील प्रत्यक्ष लढत ठरेल का, याबद्दल महिनोंमहिने तर्कवितर्क सुरू होते, पण काँग्रेसने 15 नोव्हेंबर रोजी अचानक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आणि MVAमध्ये फुट झाल्याचे स्पष्ट झाले. हा निर्णय काँग्रेसने का घेतला, तो भाजपला कसा फायदेशीर किंवा तोट्याचा ठरेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेला सोबत घेतले असते तर परिस्थिती वेगळी राहिली असती का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
मुंबई काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची सुरुवातीपासून इच्छा होती की पक्षाने स्वबळावरच लढावे. ही इच्छा त्यांनी प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याकडेही व्यक्त केली होती. अखेर या इच्छेला मान देत काँग्रेसने स्वतंत्र लढाईची रणनीती स्वीकारली. यावेळी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केलेले विधान विशेष चर्चेत आहे. त्यांनी कुठेही मनसेचे नाव घेतले नाही, पण त्यांचा रोख कोणत्या पक्षाकडे आहे हे स्पष्ट होते. ‘आम्ही संविधान मानणारे लोक आहोत. काही पक्ष सातत्याने मारहाणीची भाषा वापरतात, कायदा हातात घेतात. अशा पक्षांसोबत काँग्रेस जाऊ शकत नाही. महाविकास आघाडीत किमान समान कार्यक्रम असतो, तो सर्वांसाठी लागू असावा, पण काही पक्षांची भूमिका मारहाणीची आणि दडपशाहीची राहते’ असे त्यांनी म्हणताना मनसे आघाडीतून दूर राहणार हे स्पष्ट केले. गेल्या काही महिन्यांपासून मनसेला MVAमध्ये आणण्याबाबत चर्चेला उधाण आले होते, पण काँग्रेसच्या या भूमिकेमुळे त्या चर्चा आता संपल्या आहेत.
मुंबई महापालिकेत 227 जागांसाठी निवडणूक होणार असून स्थानिक पातळीवर असंख्य इच्छुकांची गर्दी असते. अशावेळी युती केल्यास जागा इतर पक्षांसाठी राखून ठेवाव्या लागतात, त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होते. 2017 मध्ये काँग्रेसला फक्त 30 जागांवर समाधान मानावे लागले होते. आता पक्षाला आपली ताकद पुन्हा उभारायची आहे, आणि स्वबळावर लढल्यास प्रत्येक प्रभागात आपला नेता उभा करण्याची संधी मिळेल, ही काँग्रेसची रणनीती आहे. शिवाय विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत अशा प्रकारचा प्रयोग करणे अत्यंत जोखमीचे असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही स्वबळाची परीक्षा मानल्या जातात.
मुंबईचे मतदार बहुभाषिक, बहुधर्मीय आणि विविध राज्यांतून आलेले असल्याने काँग्रेसला सर्वसमावेशक भूमिका राखावी लागते. मराठी ओळख आणि हक्कांसाठी कठोर भूमिका घेणाऱ्या मनसेसोबत किंवा पूर्वी हिंदुत्ववादी भूमिका घेतलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेसह युती केल्यास परराज्यीय मतदार नाराज होऊ शकतात. यूपी-बिहारमधील मोठा मतदारवर्ग, मुस्लीम समाजाची एकवटलेली मते आणि विविध समुदायांचे स्वतंत्र कल यामुळे काँग्रेसला संतुलित राहणे आवश्यक आहे. मनसेसोबत गेल्यास काँग्रेसला या समूहांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचे, हा मोठा राजकीय प्रश्न निर्माण झाला असता. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जरी आतापर्यंत धर्मनिरपेक्ष चेहरा घेऊन महाविकास आघाडीत काम करत असली तरी मनसेची भूमिका सतत बदलत गेली. काँग्रेसच्या दृष्टीने हा अनिश्चिततेचा धोका होता.
काँग्रेसला स्वबळावर लढण्याचे अनेक राजकीय फायदेही दिसत आहेत. आपल्या वास्तविक ताकदीचा अंदाज घेता येईल, स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह राहील, आणि निवडणुकीनंतर भविष्यात गरज पडल्यास कोणत्या पक्षापासून आम्ही दूर राहिलो हे सांगता येईल. सर्व 227 जागांवर उमेदवार उभे करता आल्याने काँग्रेसचे राजकीय अस्तित्वही अधिक ठळकपणे समोर येईल. या निकालावर आधारित पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवता येणार आहे.

