(छत्रपती संभाजीनगर / वृत्तसंस्था)
नीट पेपरफुटी प्रकरण, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत अनेक गंभीर आरोप केले आहेत. भाजपकडून पक्षात प्रवेशासाठी दबाव आणला जात असून, नकार दिल्यास धमक्या दिल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच त्यांच्या आई-वडिलांनाही अप्रत्यक्ष धमक्या देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘कितीही ऑफर आली तरी भाजपमध्ये जाणार नाही’
“मला अनेक वेळा भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मी भाजपमध्ये जाणार नाही. पक्षात या, तुमच्यासाठी चांगले आहे, अशा स्वरूपाच्या “धमक्या” दिल्या जात आहेत,” असा दावा दीपके यांनी केला.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका करत, “तरुणांना धमकावणे योग्य नाही,” असे मत व्यक्त केले. २०१४ नंतर बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचाही आरोप त्यांनी केला.
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह
दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांच्या भूमिकेवरही दीपके यांनी प्रश्न उपस्थित केले. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच दगडांनी भरलेला ट्रक घटनास्थळी आणण्यात आला होता, असा दावा करत त्यांनी संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.
पोलिसांनी संविधानानुसार वागावे, अन्यथा पक्षीय भूमिका घेऊ नये, अशी टीकाही त्यांनी केली.
‘फंडिंग’च्या आरोपांवर सरकारलाच सवाल
कॉक्रोच जनता पार्टीला परदेशातून निधी मिळत असल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना दीपके म्हणाले, “जर आम्हाला बाहेरून फंडिंग होत असेल, तर सत्तेत असलेल्या सरकारचे ते अपयश आहे. मग ते रोखण्यात सरकार अपयशी का ठरले?”
‘शेतकऱ्यांसोबत कायम उभे राहू’
दीपके यांनी सांगितले की, ते स्वतः शेतकरी कुटुंबातून आले असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भविष्यातही आंदोलनात सहभागी होणार आहेत. “जेव्हा गरज भासेल, तेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू,” असे त्यांनी स्पष्ट केले.
रामदेव यांच्या टीकेला प्रत्युत्तर
बाबा रामदेव यांनी Gen Z आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर केलेल्या टीकेला उत्तर देताना दीपके म्हणाले, “देशाची बदनामी आंदोलनामुळे नाही, तर पेपरफुटीमुळे झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे फोटो घेऊन आंदोलन करणे ही लोकशाहीची परंपरा आहे.” तसेच पतंजलीच्या उत्पादनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या निरीक्षणांचा उल्लेख करत, “रामदेव यांनी विद्यार्थ्यांवर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या कंपनीकडे लक्ष द्यावे,” असा टोला त्यांनी लगावला.
कंगना राणावतवरही निशाणा
अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत यांच्यावर टीका करत दीपके म्हणाले, “Gen Z ही १५ ते २८ वयोगटातील पिढी आहे. हीच तरुणाई उद्याचा भारत घडवणार आहे. सामान्य कुटुंबातील या मुलांना ट्रोल करून कोणाचा फायदा होणार नाही.”

