(रत्नागिरी /प्रतिनिधी)
खालगाव-जाकादेवी येथे अवघ्या एक महिना सात दिवसांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (१५ नोव्हेंबर) सकाळी घडली. शौर्य रोहन गोसावी असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शौर्यची आई अश्विनी रोहन गोसावी यांनी दिलेल्या खबरीनुसार, रविवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या दरम्यान शौर्य झोपेतून उठून रडू लागला. त्यामुळे आईने त्याला झोपलेल्या अवस्थेतच स्तनपान केले. त्यानंतर शौर्य पुन्हा झोपी गेला. त्याच्या शेजारीच आईदेखील झोपली होती.
सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या दरम्यान अश्विनी गोसावी यांना जाग आल्यानंतर त्यांनी शौर्यला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्याकडून कोणतीही हालचाल होत नव्हती तसेच तो श्वासही घेत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने घरातील नातेवाईकांना याबाबत माहिती दिली.
त्यानंतर शौर्यचे आजोबा बापू चंद्र गोसावी व इतर नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी प्रथम तरवळ येथील डॉक्टर पानंगले हॉस्पिटल, त्यानंतर खेडशी येथील डॉक्टर मुकादम हॉस्पिटल आणि रत्नागिरीतील डॉक्टर सूर्यगंध हॉस्पिटल येथे नेले. पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती सकाळी ८.२० वाजण्याच्या सुमारास त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १०४/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. अवघ्या एक महिन्याच्या चिमुकल्याच्या मृत्यूने गोसावी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


