(रत्नागिरी / वार्ताहर)
गावातील तरुणांना एकत्र आणून त्यांच्यातील मैत्रीचे नाते अधिक दृढ करणे आणि गावाची एकजूट टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या गडनरळ प्रीमियर लीग (GPL) पर्व १ – २०२६ या क्रिकेट स्पर्धेचा पहिला हंगाम रविवार, १५ नोव्हेंबर रोजी विरार पूर्व येथे उत्साहात पार पडला. राजकारणविरहित वातावरणात झालेल्या या स्पर्धेला गावातील ९६ खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आठ संघांमध्ये विभागलेल्या या स्पर्धेत संघमालकांनीही सक्रिय सहभाग घेतला.
स्पर्धेत वैभव ११, मुकुंद ११, आदितना ११, एस. एस. ब्लास्टर, कोकण टॉकीज, पी.जी., क्रिकेट क्लब आणि आपली माणसं या आठ संघांनी आपले कौशल्य पणाला लावले. या संघांचे मालक अनुक्रमे श्री. वैभव धनावडे, श्री. चिंतामणी धनावडे, श्री. रंजीत भातडे, श्री. संदेश चौघुले, श्री. अमोल भातडे, श्री. प्रमोद चौघुले, श्री. संदीप धनावडे आणि कु. मयुरेश चौघुले होते.
अटीतटीच्या लढतींनंतर वैभव ११ संघाने विजेतेपदावर नाव कोरले. या संघाचे नेतृत्व कु. विकास हरिश्चंद्र धनावडे यांनी केले. एस. एस. ब्लास्टर संघाने द्वितीय, तर कोकण टॉकीज संघाने तृतीय क्रमांक मिळवला. वैयक्तिक पुरस्कारांमध्ये मालिकावीर म्हणून कु. अक्षय धनावडे, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून श्री. वैभव धनावडे आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून श्री. योगेश यशवंत धनावडे यांची निवड करण्यात आली.
या स्पर्धेला माजी आमदार श्री. सुरेंद्रनाथ (बाळ) माने यांच्यासह श्री. बाबू पाटील, श्री. प्रथमेश गोपाळ गावणकर, श्री. समीर रामदास बळेकर, श्री. नारायण धनावडे, रोहित महाडिक, नील नागेश धनावडे, रामचंद्र धनावडे, दीपक भातडे, प्रमोद चौघुले, अरुण चौघुले, शैलेश कानसरे, केशव भातडे, हरिश्चंद्र धनावडे, अंकुश धनावडे, प्रकाश धनावडे, दुर्वास झि. चौघुले, भिकाजी धनावडे, वामन भातडे, मिलिंद धनावडे, प्रदीप चौघुले, गणेश काताळे, शुक्रदीप शिंगारे, विजय धनावडे, मनोहर चौघुले, दिनकर भातडे, ओमकार शितप, रविंद्र चौघुले, देवधर भातडे, महेश भातडे, रुपेश चौघुले, संतोष जानू धनावडे, सुनील धनावडे आणि संजय भातडे यांच्यासह अनेक मान्यवर, हितचिंतक आणि आर्थिक सहकार्य करणारे ग्रामस्थ उपस्थित होते.
गावातील तरुणांनी एकत्र येत या स्पर्धेचे नियोजन आणि आयोजन केले होते. खेळाडूंसह गावातील सुमारे १६० जणांची उपस्थिती या उपक्रमाला लाभली. संपूर्ण दिवस क्रिकेटचे सामने, खेळाडूंचा उत्साह आणि ग्रामस्थांमधील आपुलकी यामुळे स्पर्धास्थळी आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. पहिल्याच पर्वाला मिळालेला प्रतिसाद आयोजकांचा उत्साह वाढवणारा ठरला.
गडनरळ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. दिनकर भातडे यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. अशा स्पर्धांमुळे गावातील तरुणांना एकत्र येण्याची संधी मिळते. त्यामुळे आगामी काळातही GPL चे आयोजन दरवर्षी करण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गावातील तरुणांच्या अशा सकारात्मक उपक्रमांना आपला नेहमीच पाठिंबा राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
GPL च्या पहिल्या पर्वाच्या यशस्वी आयोजनामध्ये सहभागी ९६ खेळाडू, आठही संघांचे मालक, नियोजनासाठी मेहनत घेणारे तरुण, आर्थिक मदत करणारे दाते, मान्यवर, हितचिंतक आणि उपस्थित ग्रामस्थ या सर्वांचे योगदान महत्त्वाचे ठरले. हे यश कोणत्याही एका व्यक्तीचे किंवा संस्थेचे नसून संपूर्ण गावाच्या एकजुटीचे आणि सामूहिक सहकार्याचे प्रतीक असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. सर्वांच्या सहभागातून गडनरळ प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाची उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी सांगता झाली.


