(राजापूर /रत्नागिरी)
मागील सहा महिन्यांपासून हृदयविकाराशी झुंज देणाऱ्या आणि मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झालेल्या राजापूर येथील ७० वर्षीय वृद्धाचा अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला. रमेश सोनू चव्हाण (वय ७०, रा. साईनगर, राजापूर) असे मृत वृद्धाचे नाव आहे. मंगळवारी (१० नोव्हेंबर) सायंकाळी छातीत तीव्र वेदना सुरू झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
रमेश चव्हाण यांना मागील सहा महिन्यांपासून हृदयविकाराचा त्रास होता. त्यांच्यावर मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती. दरम्यान, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांना अचानक छातीत दुखू लागले. त्यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच शेजारी राहणारे सुनील सातोसे यांनी त्यांना तातडीने खासगी दवाखान्यात नेले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालय, राजापूर येथे नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सायंकाळी ६.४० वाजता तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ७१/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. या घटनेमुळे साईनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


