(संगमेश्वर / सत्यवान विचारे)
संगमेश्वर तालुक्यातील नायरी (मुळगाव फणसवणे) येथील ९१ वर्षीय जुलेखा इसाक मोडक यांच्या मृत्यूप्रकरणाला आता महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे. वृद्ध सासूला लाकडी दांडक्याने आणि हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप असलेल्या सुनेला संगमेश्वर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना मिळून येत नसलेल्या संशयित महिलेचा पोलिसांनी कसून माग काढला. बुधवारी पहाटेपासून सुरू केलेल्या शोधमोहिमेनंतर सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास तिला ताब्यात घेण्यात आले. वृद्ध महिलेच्या मृत्यूमुळे आधीच गंभीर बनलेल्या या प्रकरणात सुनेच्या अटकेने तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुलेखा इसाक मोडक (वय ९१, रा. नायरी, ता. संगमेश्वर) यांना २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरी मारहाण झाल्याची तक्रार करण्यात आली होती. वृद्ध सासूची देखभाल करावी लागत असल्याने तसेच त्यांना कुठेही फिरायला जाता येत नसल्याच्या कारणावरून सून नाशिरा अस्लम मोडक हिने लाकडी दांडक्याने आणि हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. या मारहाणीत जुलेखा यांच्या उजव्या गुडघ्याला, डाव्या पायाला आणि उजव्या मनगटाला दुखापत झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते. याप्रकरणी जुलेखा मोडक यांची मुलगी जैबुनिसा निजामुद्दीन लांबे (वय ६०, रा. नेरूळ, नवी मुंबई) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सुनेविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. दरम्यान, जखमी जुलेखा मोडक यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मारहाणीच्या तक्रारीपुरते मर्यादित असलेल्या या प्रकरणाचे गांभीर्य वाढले. मारहाण आणि वृद्धेचा मृत्यू यांचा वैद्यकीयदृष्ट्या नेमका संबंध काय, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.
वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर संशयित सून नाशिरा मोडक पोलिसांना मिळून येत नव्हती. त्यामुळे संगमेश्वर पोलिसांनी तिचा शोध सुरू ठेवला होता. नायरी येथील तिच्या घराच्या समोरील दरवाजाला कडी, तर मागील बाजूला कुलूप असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे घरावर लक्ष ठेवण्यात येत होते. बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल विनय मनवल यांनी संशयित महिलेचा माग काढण्यास सुरुवात केली. बंद घरात कोणीतरी असल्याचा संशय आल्याने त्यांनी त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केले. त्यानंतर सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास हेड कॉन्स्टेबल विनय मनवल, हेड कॉन्स्टेबल क्रांती सावंत आणि पोलीस हवालदार भोसले यांनी नाशिरा मोडक हिला ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईची परिसरात चर्चा सुरू आहे.
पाच दिवसांची पोलीस कोठडी
९१ वर्षीय जुलेखा इसाक मोडक यांच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सून नाशिरा अस्लम मोडक हिला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासाच्या दृष्टीने ही कोठडी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या कालावधीत कथित मारहाणीची पार्श्वभूमी, घटनेवेळी नेमके काय घडले आणि वृद्ध महिलेच्या मृत्यूशी मारहाणीचा संबंध आहे का, या बाबींचा पोलीस तपास करणार आहेत. पाच दिवसांची कोठडी संपल्यानंतर आरोपी महिलेला सोमवारी देवरुख न्यायालयात पुन्हा हजर करण्यात येणार आहे.
प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मितेश केणी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. ९१ वर्षांच्या वृद्ध महिलेवरील कथित मारहाणीपासून सुरू झालेले हे प्रकरण आता तिच्या मृत्यू आणि सुनेच्या अटकेपर्यंत पोहोचले. वृद्धेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, कथित मारहाणीचा मृत्यूशी वैद्यकीय संबंध आहे का आणि त्यानुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई कोणती होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.


