(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील निवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील चव्हाणवाडी येथील माजी पोलीस पाटील कै. मारुती बाणे यांचे नातू वेद विकास बाणे याची पुणे येथे होणाऱ्या १४ वर्षांखालील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा संघात निवड झाली आहे. या यशामुळे चव्हाणवाडीसह संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, वेदचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून सुमारे दोनशे गुणवान खेळाडूंनी या निवड प्रक्रियेत सहभाग घेतला होता. या कठीण स्पर्धेतून अंतिम संघासाठी निवड करण्यात आली असून, त्यामध्ये वेद बाणे याने अष्टपैलू खेळाडू म्हणून आपले स्थान मिळवले आहे.
वेद कै. छोटू देसाई क्रिकेट अकॅडमी, रत्नागिरी येथे प्रशिक्षण घेत आहे. दर्जेदार प्रशिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळेच हे यश मिळाल्याचे त्याचे प्रशिक्षक सांगतात. या अकॅडमीमधून यापूर्वीही अनेक खेळाडूंनी महाराष्ट्र संघात स्थान मिळवले असून, वेदच्या निवडीने या परंपरेत आणखी एक यशस्वी पायरी जोडली गेली आहे.
वेदने सांगितले की, “विराट कोहली हा माझा आदर्श असून, भविष्यात एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून देशासाठी खेळण्याचे माझे स्वप्न आहे.” सध्या त्याच्या गोलंदाजीचा वेग १०० ते १०५ किमी प्रतितास असल्याचे कळते.

