(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
घराच्या मागील दरवाजाचे कुलूप कठीण हत्याराने उचकटून आत प्रवेश करायचा, लोखंडी कपाटातील लॉकर फोडायचा आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखोंची रोकड घेऊन पसार व्हायचे, असा धक्कादायक प्रकार संगमेश्वर तालुक्यातील बागवाडी येथे उघडकीस आला आहे. अज्ञात चोरट्याने घरफोडी करून तब्बल ३ लाख ५१ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास केला. यामध्ये सोन्याचे हार, कानातील दागिने, चांदीचे अलंकार आणि १ लाख ७० हजार रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे. याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगिता रविंद्र फेफडे (वय ४०, मूळ रा. शिवणे, ता. संगमेश्वर) या सध्या संगमेश्वर तालुक्यातील बागवाडी येथे श्रीराम नारायण कदम यांच्या घरी भाड्याने राहतात. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजल्यापासून ते ९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराला लक्ष्य केले. घराच्या मागील दरवाजाला कठीण हत्याराने उचकटून चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर हॉलमधील लोखंडी पत्र्याच्या कपाटातील लॉकरही हत्याराने उचकटून त्यातील दागिने आणि रोकड चोरून नेली. चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये २००४ मध्ये तयार केलेला ६० हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार, २०२२ मध्ये तयार केलेला १२ ग्रॅम वजनाचा ८० हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार, सहा ग्रॅम वजनाचे १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातले आणि जास्वंदीच्या फुलाची नक्षी असलेले चार ग्रॅम वजनाचे १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातले यांचा समावेश आहे.
याशिवाय दोन जोड चांदीचे पैंजण, लहान मुलांची चांदीची बाळी, सात जोड चांदीची जोडवी व मासोळी, चांदीची वाटी, चांदीचे ब्रेसलेट आणि चार चांदीच्या मनगट्या असा ऐवजही चोरट्याने लंपास केला. विशेष म्हणजे, घरातील पाचशे रुपयांच्या नोटांच्या स्वरूपातील तब्बल १ लाख ७० हजार रुपयांच्या रोकडवरही चोरट्याने हात साफ केला. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ३ लाख ५१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर योगिता फेफडे यांनी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार १० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २.२२ वाजता अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१(१), ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान आता देवरुख पोलिसांसमोर आहे.


