(त्र्यंबकेश्वर / वृत्तसंस्था)
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी शिवारातील बेझे धरणात बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. धरणाच्या लगत असलेल्या उत्तम चव्हाण यांच्याकडे पाहुणे म्हणून आलेले पिता आणि त्यांच्या दोन मुली आंघोळीसाठी पाण्यात उतरले असता ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे वाघेरे आणि अंजनेरी परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये सुरेश नामदेव भोर (वय ४२ वर्ष), ज्योती सुरेश भोर (वय १० वर्ष) आणि हर्षदा सुरेश भोर (वय ७ वर्ष) यांचा समावेश आहे. हे तिघेही वाघेरे येथील रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९:३० ते १०:३० वाजेच्या सुमारास ते बेझे धरण परिसरात आंघोळीसाठी गेले होते. यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीने तिघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.
एकाच कुटुंबातील वडील आणि दोन लहान मुलींचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने वाघेरे गावासह अंजनेरी परिसरातील नागरिकांमधून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची अधिकृत माहिती त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदारांनी दिली आहे.


