(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल येथील पी. एम. श्री. जिल्हा परिषद गणेश विद्या मंदिर आदर्श शाळा, पाचल नं. ५ या शाळेच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२.३० वाजता शाळेच्या प्रांगणात होणाऱ्या या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत प्रमुख उपस्थित राहणार असून, राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे.
पाचल परिसरातील शैक्षणिक सुविधांच्या विस्ताराच्या दृष्टीने या नव्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. नूतन इमारतीच्या उभारणीनंतर विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, तालुकाप्रमुख दीपक नागले, राजापूर पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, जिल्हा परिषद सदस्य सिद्धाली मोरे, पंचायत समिती सदस्य समीक्षा वाफेकर व अपेक्षा मासये, पाचल गावचे सरपंच बाबालाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, पाचल विभागप्रमुख शैलेश साळवी, अमर जाधव आणि युवासेना तालुकाप्रमुख सुनील गुरव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्याला पाचलसह परिसरातील ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिक आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती आणि श्री महागणपती उत्सव मंडळ, पाचल यांच्या वतीने करण्यात आले आहे.


