(राजापूर)
शहरानजीकच्या कोदवली साईनगर पुनर्वसन वसाहतीतील रहिवाशी आणि भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते तेजस शरद करंबेळकर (32) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने करंबेळकर कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
प्रकृती अस्वस्थ झाल्याने तेजस यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच मंगळवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
तेजस हे भाजपाचे उत्साही आणि निष्ठावान कार्यकर्ते होते. पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये तसेच संघटनात्मक कामकाजात त्यांचा नेहमीच उत्स्फूर्त सहभाग असे. शांत, संयमी आणि मितभाषी स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात घर करून होते. सध्या ते मुथुट फायनान्स कंपनीमध्ये कार्यरत होते.
घरातील एकुलते एक कमावते सदस्य असलेल्या तेजस यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबाला मोठा आधार गमवावा लागला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, एक बहीण, काका, काकी आणि चुलत भाऊ असा दुःखी परिवार आहे.
आकस्मिक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

