(मुंबई/ वृत्तसंस्था)
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे बोर्डाने काही महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचे क्रमांक आणि श्रेणी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सुपरफास्ट एक्स्प्रेस, गरीब रथ आणि पॅसेंजर गाड्यांच्या क्रमांकात बदल करण्यात येणार असून, काही गाड्यांचा सुपरफास्ट व एसी सुपरफास्ट हा दर्जा काढून त्याऐवजी एक्स्प्रेस असा करण्यात येणार आहे. हे बदल १ जानेवारी २०२७ पासून लागू होणार आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक १० नोव्हेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आले आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते तिरुवनंतपुरम नॉर्थदरम्यान धावणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेसचा क्रमांक २२११३ बदलून ११०७३ करण्यात येणार आहे. तसेच परतीच्या प्रवासातील गाडी क्रमांक २२११४ ऐवजी ११०७४ असा नवीन क्रमांक असेल. या दोन्ही गाड्यांना सुपरफास्टऐवजी एक्स्प्रेस श्रेणी देण्यात आली आहे. नव्या क्रमांकानुसार या गाड्यांच्या प्रवासाची सुरुवात अनुक्रमे ५ जानेवारी २०२७ आणि ४ जानेवारी २०२७ पासून होईल.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी दरम्यान धावणाऱ्या एसी सुपरफास्ट एक्स्प्रेसचा क्रमांक २२११५ बदलून ११०५३ करण्यात येणार आहे. तर करमळी ते लोकमान्य टिळक टर्मिनस या दिशेने धावणाऱ्या गाडीचा क्रमांक २२११६ ऐवजी ११०५४ असा असेल. या दोन्ही गाड्यांना एसी सुपरफास्टऐवजी एक्स्प्रेस श्रेणी देण्यात आली आहे. या बदलांची अंमलबजावणी ७ जानेवारी २०२७ पासून होणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम नॉर्थदरम्यान धावणाऱ्या गरीब रथ सुपरफास्ट एक्स्प्रेसचा क्रमांक १२२०१ बदलून १६३७१ करण्यात येणार आहे. परतीच्या दिशेने धावणाऱ्या गाडीचा क्रमांक १२२०२ ऐवजी १६३७२ असा असेल. या दोन्ही गाड्यांना एक्स्प्रेस श्रेणी देण्यात आली असून, नव्या क्रमांकानुसार प्रवासाची सुरुवात अनुक्रमे १ जानेवारी २०२७ आणि ३ जानेवारी २०२७ पासून होईल.
वास्को द गामा ते हजरत निजामुद्दीनदरम्यान धावणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेसचा क्रमांक १२७७९ बदलून १७३७९ करण्यात येणार आहे. तर हजरत निजामुद्दीन ते वास्को द गामा या दिशेने धावणाऱ्या गाडीचा क्रमांक १२७८० ऐवजी १७३८० असा असेल. या दोन्ही गाड्यांचा सुपरफास्ट दर्जा बदलून एक्स्प्रेस श्रेणी करण्यात आली आहे. हे बदल १ जानेवारी २०२७ पासून लागू होतील.
दरम्यान, मडगाव जंक्शन ते मंगळुरू सेंट्रलदरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर गाडीचा क्रमांक ५६६१५ बदलून ५६२१६ करण्यात येणार आहे. तर मंगळुरू सेंट्रल ते मडगाव जंक्शन या मार्गावरील गाडीचा क्रमांक ५६६१६ ऐवजी ५६२१५ असा असेल. या दोन्ही गाड्यांचे नवीन क्रमांक १ जानेवारी २०२७ पासून लागू होणार आहेत.
रेल्वेच्या या निर्णयामुळे संबंधित मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी १ जानेवारी २०२७ पासून लागू होणारे नवीन रेल्वे क्रमांक आणि प्रवास सुरू होण्याच्या तारखा लक्षात घेणे आवश्यक आहे. रेल्वेचे हे बदल रेल्वे बोर्डाच्या निर्णयानुसार करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. सदर प्रसिद्धीपत्रक मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांचेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.


