(राजापूर / रत्नागिरी)
जमिनीच्या वादासह जादूटोण्याच्या संशयातून सातत्याने मानसिक छळ करून एका व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप करत राजापूर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे ताम्हाणे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
याप्रकरणी सरिता संजय ताम्हणकर (वय ५२, रा. ताम्हाणे-ताम्हणकरवाडी, ता. राजापूर) यांनी राजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, नामदेव गोविंद ताम्हणकर (वय ५६), अनिता नामदेव ताम्हणकर (वय ५०), मनोहर सोमा ताम्हणकर (वय ६८), मनीषा मनोहर ताम्हणकर (वय ६३), विशाल मनोहर ताम्हणकर (वय ३९) आणि सागर मनोहर ताम्हणकर (वय ३७, सर्व रा. ताम्हाणे) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, संशयितांकडून जमिनीच्या वादातून तसेच जादूटोण्याच्या संशयावरून त्यांच्या पतीला वारंवार मानसिक त्रास देण्यात येत होता. या सततच्या त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे राजापूर पोलिसांनी संबंधितांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, घटनेमागील नेमके कारण, परिस्थिती आणि सर्व बाबींचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

