(देवरूख / वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील निवेखुर्द माईनवाडी येथील श्री गांगोबा प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत बी. कॉम.च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या कु. प्रणय प्रवीण महापदी (रा. पोसरे खुर्द, पंधरा गाव, ता. खेड, जि. रत्नागिरी) याच्या किडनी प्रत्यारोपण उपचारासाठी तब्बल १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. दोन्ही किडन्या निकामी झाल्याने प्रणयची प्रकृती गंभीर बनली होती. अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई येथील डॉक्टरांनी तातडीने किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता. या उपचारासाठी अंदाजे १० ते १२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याने बेताच्या आर्थिक परिस्थितीतील महापदी कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले होते.
मुलाची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असताना उपचारासाठी आवश्यक निधी उभारण्यासाठी कुटुंबीयांनी अनेक ठिकाणी प्रयत्न केले; मात्र अपेक्षित मदत मिळत नव्हती. अखेर प्रणयचे वडील श्री. प्रवीण महापदी यांनी श्री गांगोबा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रतिष्ठानने तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला.
संस्थेचे अध्यक्ष श्री. कृष्णा माईन, सेक्रेटरी श्री. विजय मनोहर माईन, व्यवस्थापक श्री. विशाल कृष्णा माईन, श्री. प्रकाश सोमा माईन, श्री. संजय सीताराम माईन, खजिनदार श्री. प्रदीप सापते तसेच सभासद श्री. वैभव माईन यांनी उपचारासाठी आवश्यक मदत उभी करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले. अनेक दानशूर व्यक्तींशी संपर्क साधून प्रणयच्या उपचाराची माहिती देण्यात आली. वैभव माईन आणि संस्थेच्या अध्यक्षांनी डॉक्टरांशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही केली. या प्रयत्नांतून जवळपास तब्बल १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून श्री. प्रवीण महापदी यांच्या खात्यावर सुपूर्द करण्यात आला.
दरम्यान, प्रणयच्या आई सौ. प्रणाली प्रवीण महापदी यांनी मुलाला किडनी दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. आईने केलेल्या या त्यागामुळे मुलाच्या उपचाराला मोठी मदत झाली. आईने मुलाला जणू दुसऱ्यांदा जन्म दिला, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
२६ ऑगस्ट २०२६ रोजी अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई येथे प्रणयच्या किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. त्यानंतर ५ सप्टेंबर २०२६ रोजी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ८ सप्टेंबर २०२६ रोजी श्री गांगोबा प्रतिष्ठानच्या सभासदांनी प्रणय, त्याची आई आणि संपूर्ण महापदी कुटुंबीयांची भेट घेऊन प्रणयच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच कुटुंबीयांना धीर दिला.
संकटाच्या काळात प्रतिष्ठानने केलेल्या १० लाख रुपयांच्या मदतीबद्दल महापदी कुटुंबीयांनी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. ही मदत आयुष्यभर विसरणार नसल्याच्या भावना व्यक्त करताना त्यांना भावनाही अनावर झाल्या.
श्री गांगोबा प्रतिष्ठानकडून विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. मार्च २०२६ मध्ये आश्रमशाळा, पडसरे, पाली, रायगड येथील आदिवासी भागातील सुमारे ४०० विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले होते. या उपक्रमासाठी लोकसहभागातून संस्थेने जवळपास १ लाख २५ हजार रुपयांचा खर्च केला होता.
संकटाच्या काळात गरजूंच्या मदतीसाठी पुढे येत श्री गांगोबा प्रतिष्ठानने प्रणयच्या किडनी प्रत्यारोपणासाठी केलेली १० लाख रुपयांची मदत सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरली आहे. प्रतिष्ठानच्या या समाजोपयोगी कार्याचे परिसरातून सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


