(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये मिठाई आणि फराळाच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली असतानाच, या गर्दीचा फायदा घेत ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याचा संशयास्पद प्रकार समोर आला आहे. मिठाईमध्ये प्रतिबंधित कृत्रिम रंगाचा वापर, खव्यामधील संभाव्य भेसळ आणि उघड्यावर सुटे खाद्यतेल विक्री होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत रत्नागिरी शहर, ग्रामीण भाग आणि दापोली परिसरातील सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत एकूण १ लाख २७ हजार २८० रुपयांचा संशयित साठा जप्त करण्यात आला असून, ३२ अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
दिवाळी म्हणजे मिठाई, फराळ आणि खरेदीचा उत्साह; मात्र याच उत्सवाच्या काळात ग्राहकांच्या ताटात भेसळीचे पदार्थ जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने अन्न प्रशासनाने तपासणीचा धडाका लावला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मिठाईमध्ये प्रतिबंधित कृत्रिम रंगाचा वापर, खव्याची गुणवत्ता आणि सुटे खाद्यतेल विक्री यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार मिठाईची दुकाने, किराणा दुकाने आणि फराळ विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली.
रत्नागिरी शहरातील एका मिठाईच्या दुकानात टर्काईज रंगाचा वापर केलेला असल्याचा संशय असलेला सहा किलो काजू रोल आढळून आला. त्याची किंमत १० हजार ३२० रुपये आहे. दापोली परिसरातील कारवाईत १० किलो म्हैसूर पाक आणि १३ किलो मलाई बर्फी असा एकूण ११ हजार ५२० रुपयांचा साठा ताब्यात घेण्यात आला. तर रत्नागिरी शहरातील अन्य एका कारवाईत १८ किलो खवा आणि १० किलो सुटे खाद्यतेल असा ७ हजार ८८० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. याशिवाय फरसाण, बेसन, मैदा आणि कोकम आगळ यांसह विविध खाद्यपदार्थांचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
प्रयोगशाळेच्या अहवालाकडे लक्ष
कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेला संशयित साठा आणि संकलित केलेले ३२ अन्न नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांच्या अहवालातून पदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि संभाव्य भेसळीबाबत स्पष्टता येणार आहे. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील तरतुदींनुसार संबंधितांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सणाच्या आनंदात आरोग्याशी तडजोड नको!
दिवाळीच्या खरेदीत केवळ आकर्षक रंग, सजावट आणि स्वस्त दर यांना भुलून खाद्यपदार्थांची खरेदी करू नये. ग्राहकांनी शक्यतो पॅकबंद, योग्य लेबल असलेले आणि बिलासह खाद्यपदार्थ खरेदी करावेत. मिठाई अथवा फराळाच्या पदार्थांमध्ये भेसळ किंवा निकृष्ट दर्जा आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी तपासणी आणि कारवाईची मोहीम प्रभावीपणे राबविण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.


