(संगमेश्वर / वार्ताहर)
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाशी संबंधित कामकाजासाठी असलेले संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे तलाठी कार्यालय बऱ्याच वेळा बंद असल्याचा दावा सचिन पाटील यांनी केला आहे. कार्यालय बंद ठेवणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य तो न्याय द्यावा, या मागणीसाठी सचिन पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे.
दाभोळे तलाठी कार्यालयातील कोतवाल शासकीय तलाठी कार्यालयात न बसता अन्य कार्यालयात बसून काम करत असल्याचा आरोपही सचिन पाटील यांनी केला आहे. संबंधित कोतवालांना नेते आणि अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच अन्य ठिकाणी कार्यालय थाटून काही गैरव्यवहार केला जात नाही ना, याची खातरजमा कोण करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
महसुली कामांसाठी दाभोळे तलाठी कार्यालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांना कार्यालय बंद असल्यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे. नियमितपणे कार्यालय बंद राहत असल्याच्या दाव्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करत शासनकर्त्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, उपोषणकर्त्या सचिन पाटील यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, याचा विचार करून प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी दाभोळेवासीयांकडून करण्यात येत आहे.


