(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत आगामी गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सरंद येथील साठे मंगल कार्यालयात विशेष शांतता समिती व मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मितिश किनी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीला माखजन पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीतील २२ गावांमधील पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, गावातील प्रमुख मानकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य सुशील भायजे, पंचायत समिती सदस्य बावा जड्यार यांच्यासह विविध गावांचे सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष आणि ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी गणेशोत्सव काळात पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
पोलीस निरीक्षक मितिश किनी यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. गणेशोत्सव हा संगमेश्वर तालुक्यासह संपूर्ण कोकणातील अत्यंत पवित्र आणि आपुलकीचा सण असल्याचे सांगत या काळात कायदा व सुव्यवस्था राखणे ही सर्वांची सामायिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, शासकीय नियम व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे आणि गणेशोत्सव निर्भय, सुरक्षित व पारंपारिक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
सणासुदीच्या काळात सोशल मीडियाचा वापर वाढत असल्याने नागरिकांनी धार्मिक भावना दुखावणारे संदेश किंवा अफवा पसरवू नयेत, असेही किनी यांनी स्पष्ट केले. तसेच अज्ञात आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नये आणि आपली गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नये, असा सल्ला त्यांनी दिला.
माखजन पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी यांनीही उत्सवातील नियम आणि सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. गणेशोत्सवाचा आनंद घेताना परिसरातील शांतता व सुव्यवस्था कायम राहील, याची जबाबदारी प्रत्येक ग्रामस्थ आणि गणेशोत्सव मंडळाने घ्यावी, असे त्यांनी सांगितले. मिरवणुकीचे नियम, ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियम तसेच इतर प्रशासकीय सूचनांचे पालन करून एकोप्याने आणि पारंपारिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन फसवणूक, फेक लिंक्स आणि ओटीपी फ्रॉडपासून नागरिकांनी सावध राहावे, असे साळवी यांनी सांगितले. कोणताही संशयास्पद मेसेज किंवा कॉल प्राप्त झाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
बैठकीच्या शेवटी उपस्थित लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि पोलीस पाटील यांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आश्वासन दिले. माखजन पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीतील २२ गावांमध्ये पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साही वातावरणात पार पाडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


