(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
घराचा दरवाजा बंद असताना आतून कुजल्यासारखा उग्र वास येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दरवाजा उघडताच ४३ वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळून आल्याची घटना परटवणे येथील सरोदेवाडी परिसरात उघडकीस आली. रामदास मोहन पाटील (वय ४३, रा. परटवणे, सरोदेवाडी, साई मंदिर परिसर, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खबर देणारे अमर राजेंद्र पाटील हे आपल्या राहत्या घरी असताना त्यांना परटवणे येथील अमर अनंत शिवगण यांचा फोन आला. रामदास यांच्या घराचा दरवाजा बंद असून, घरातून कुजल्यासारखा वास येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर अमर पाटील यांनी आपला भाऊ रामदास याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे अमर पाटील यांनी तातडीने परटवणे येथील घर गाठले. त्यांनी दरवाजातून रामदास यांना आवाज दिला; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने दरवाजा उघडून पाहिले असता रामदास हे बेडरूममध्ये जमिनीवर उताण्या अवस्थेत पडलेले दिसले. त्यांची अवस्था पाहून अमर पाटील यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांच्या मदतीने रामदास यांना जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.०५ वाजण्याच्या सुमारास तपासून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १४६/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. रामदास पाटील यांच्या मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होणार असून, रत्नागिरी शहर पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.


