(रत्नागिरी / वार्ताहर)
पेट्रोल, डिझेल, CNG तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले असून वाढत्या महागाईवर नियंत्रण आणावे, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रत्नागिरी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
रत्नागिरी तालुकाप्रमुख मयुरेश पाटील यांनी दिलेल्या निवेदनात इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढल्याने खाद्यतेल, डाळी, धान्य, दूध, भाजीपाला आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वाढत्या महागाईमुळे कुटुंबांचे मासिक आर्थिक बजेट कोलमडले असून बेरोजगारी, अपुरी मिळकत आणि आर्थिक अस्थिरता यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. घरखर्च भागविताना नागरिकांना कर्ज, वाहनकर्ज आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्यांचा मोठा ताण सहन करावा लागत आहे.
तसेच मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्यावरील वाढता भार आणि दैनंदिन गरजांच्या वस्तूंच्या वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शिवसेनेच्या वतीने प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत :
- पेट्रोल, डिझेल आणि CNG दरवाढ तात्काळ मागे घ्यावी
- खाद्यतेल, डाळी व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात
- साठेबाजी आणि कृत्रिम दरवाढ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी
- महागाईमुळे त्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी विशेष आर्थिक उपाय जाहीर करावेत
या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख मयूरेश्वर पाटील, उपतालुका प्रमुख विजय देसाई, विभाग प्रमुख किरण तोडणकर, युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत, सलिल डाफळे, बावा सावंत, कॉलेज कक्ष तालुका अधिकारी अमन राणे, उपविभाग प्रमुख सचिन सावंत देसाई, माजी विभागप्रमुख शैलेन्द्र चव्हाण, शाखाप्रमुख अजिंक्य सुर्वे आदी उपस्थित होते.
सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

