(रत्नागिरी /प्रतिनिधी)
पंतप्रधानांपासून ते गल्लीबोळातील नेत्यांपर्यंत प्रत्येक जण देशाच्या ‘डिजिटलायझेशन’चे ढोल बडवत असताना, रत्नागिरी एसटी डेपोचा कारभार मात्र अजूनही जुनाट आणि दगडयुगातच अडकून पडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. भाजीवाला, चहावाला आणि अगदी वडापावची टपरी चालवणाराही आज खिशात ‘क्यूआर कोड’ (QR Code) घेऊन फिरतो आहे. परंतु, दरमहा कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या रत्नागिरी एसटी डेपोच्या तिकीट खिडक्यांवर मात्र अजूनही फक्त रोख (Cash) व्यवहारांचाच अट्टाहास धरला जात आहे. डेपोमध्ये UPI किंवा ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्याची कोणतीही आधुनिक सुविधा उपलब्ध नसल्याने, परतीच्या प्रवासाला निघालेल्या हजारो कोंकणकरांना नाहक मनस्ताप आणि आर्थिक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सध्या दीपावली आणि उत्सवाचा काळ संपवून मुंबई, पुण्यासारख्या महानगरांच्या दिशेने परतीचा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची एसटी डेपोत प्रचंड गर्दी होत आहे. अनेक प्रवासी तासनतास लांबच लांब रांगेत ताटकळत उभे राहतात. मात्र, जेव्हा त्यांचा नंबर खिडकीवर येतो, तेव्हा “ऑनलाईन चालणार नाही, फक्त कॅश द्या,” असे उद्धट उत्तर वाहक किंवा कर्मचाऱ्यांकडून ऐकायला मिळते. खिशात स्मार्टफोन आणि बँक खात्यात पैसे असूनही, केवळ हातामध्ये कागदी नोटा नसल्यामुळे अनेक प्रवाशांची पूर्ण निराशा होत आहे. ऐनवेळी बुकिंग सोडून प्रवाशांना पैसे काढण्यासाठी जवळच्या एटीएम (ATM) किंवा बँकेकडे धाव घ्यावी लागत आहे. एसटी महामंडळाच्या या भोंगळ आणि सुस्त कारभारामुळे प्रवाशांचा केवळ वेळच वाया जात नाही, तर एटीएममधून पैसे काढून परत येईपर्यंत हक्काचे आरक्षित (Booking) तिकीटही हातातून निसटून जाते. “डिजिटल इंडियाच्या बाता मारणारे सरकार एसटी महामंडळाला साधे स्वाइप मशीन किंवा क्यूआर कोड देऊ शकत नाही का?” असा रोकडात सवाल संप्तत प्रवासी विचारत आहेत.
प्रवाशांची वाढती संख्या आणि आधुनिक काळाची गरज ओळखून रत्नागिरी डेपोत तात्काळ सर्व तिकीट खिडक्यांवर ऑनलाईन पेमेंटची (UPI) अधिकृत सुविधा सुरू करावी, अशी मागणी आता प्रवासी वर्गातून केली जात आहे. कोट्यवधींचे उत्पन्न देणाऱ्या रत्नागिरीकरांना अशी हिन दर्जाची सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आता तरी जाग येणार का, की प्रवासी असेच एटीएमचे उंबरठे झिजवत राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


