(दापोली/ रत्नागिरी)
अवघ्या ४१ दिवसांच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रिशा नरेश पावसे (वय ४१ दिवस, रा. पाजपंढरी, ता. दापोली) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. लघवी आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिला विविध रुग्णालयांत उपचारासाठी हलविण्यात आले होते. अखेर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना १ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.५१ वाजता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रिशा हिला लघवी करण्यास तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सुरुवातीला दापोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारांसाठी तिला महाड येथील अर्थव चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, तेथे आवश्यक अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध नसल्याने आणि चिमुकलीला श्वसनाचा त्रास कायम असल्याने डॉक्टरांनी तिला डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, तिची आई, खबर देणारे काका योगेश दिलीप पावसे यांची पत्नी आणि बहीण यांच्या सोबत चिमुकलीला रुग्णवाहिकेतून डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात नेण्यात आले. १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.१२ वाजता तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच सायंकाळी ७.५१ वाजता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ८६/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. अवघ्या ४१ दिवसांच्या चिमुकलीच्या मृत्यूने पावसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


