(मुंबई/ वृत्तसंस्था)
दिवाळीचा सण संपताच सर्वसामान्यांच्या घरखर्चात आणखी वाढ होणार आहे. देशातील दोन प्रमुख दूध उत्पादक कंपन्यांनी दुधाच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला असून, अमूल आणि मदर डेअरीचे दूध आज (गुरुवार, १२ नोव्हेंबर) पासून महागणार आहे. ताज्या पाऊच दुधाच्या विविध प्रकारांमध्ये प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. टोंड, डबल टोन्ड, फुल क्रीम आणि म्हशीच्या दुधाच्या दरवाढीमुळे ग्राहकांना आता दुधासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
मदर डेअरीने बुधवारी सकाळीच आपल्या विविध प्रकारच्या दुधाच्या किमती वाढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता अमूलनेही देशभरातील ताज्या पाऊच दुधाच्या दरात प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. या निर्णयामुळे दुधाच्या किमतींमध्ये ४ ते ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अमूल ब्रँडअंतर्गत दुधाची विक्री करणाऱ्या गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) दरवाढीमागील कारण स्पष्ट केले आहे. जनावरांचा चारा, पशुखाद्य, पॅकेजिंगसाठी लागणारे साहित्य आणि इंधनाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने दूध उत्पादन आणि प्रक्रिया करण्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे दरांमध्ये सुधारणा करणे आवश्यक झाल्याचे फेडरेशनने म्हटले आहे. दरवाढीतून मिळणाऱ्या अतिरिक्त महसुलाचा मोठा हिस्सा दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिला जाणार असून, त्यांना योग्य मोबदला मिळण्यास यामुळे मदत होईल, असेही फेडरेशनने स्पष्ट केले.
फेडरेशनने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक विक्री होणाऱ्या ३ टक्के फॅटयुक्त अमुल ताजा टोन्ड दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची म्हणजेच ३.३ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तर ६ टक्के फॅट असलेल्या अमुल गोल्डच्या किमतीत प्रतिलिटर ४ रुपये म्हणजेच ५.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी चालू वर्षातील मे महिन्यातही अमूलने प्रतिलिटर २ रुपयांची दरवाढ केली होती.
नव्या दरांनुसार, अमुल ताजा टोन्ड दूध आता प्रतिलिटर ६१ रुपयांना, तर अमुल गोल्ड ७६ रुपयांना मिळणार आहे.
दरम्यान, दिल्ली-एनसीआर परिसरातील सर्वात मोठी दूध पुरवठादार कंपनी असलेल्या मदर डेअरीनेही फुल क्रीम, टोन्ड, डबल टोन्ड आणि गायीच्या दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. उत्पादन खर्चात झालेली वाढ हे दरवाढीचे प्रमुख कारण असल्याचे कंपनीने सांगितले आहे. प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची ही वाढ १२ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये मदर डेअरीच्या फुल क्रीम पाऊच दुधाचा दर ७२ रुपयांवरून ७६ रुपये झाला आहे. टोन्ड दुधासाठी आता प्रतिलिटर ६२ रुपये मोजावे लागतील, यापूर्वी हा दर ६० रुपये होता. टोन्ड दूध टोकन किंवा बल्क व्हेंडेड प्रकारात ५८ रुपयांऐवजी ६० रुपये, तर डबल टोन्ड दुधासाठी ५४ रुपयांऐवजी ५६ रुपये द्यावे लागतील. गायीच्या दुधाचा दरही प्रतिलिटर ६२ रुपयांवरून ६५ रुपये करण्यात आला आहे.
मदर डेअरीने यापूर्वी १४ मे २०२६ रोजी दुधाच्या किमती वाढवल्या होत्या. त्याआधी एप्रिल २०२५ मध्ये दरांमध्ये सुधारणा करण्यात आली होती.
दुधाच्या दरवाढीमागे केवळ पशुखाद्य आणि चाऱ्याच्या वाढलेल्या किमतीच नव्हे, तर दुधाच्या पुरवठ्यातील घटही कारणीभूत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांत दुधातील फॅटच्या किमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी, दूध खरेदीसाठी कंपन्यांना अधिक खर्च करावा लागत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळावा आणि दूध संकलनात वाढ व्हावी, या उद्देशानेही खरेदीचे दर वाढवण्यात आले आहेत.
अमूल आणि मदर डेअरी या देशातील दोन प्रमुख ब्रँड्सनी एकाच वेळी दरवाढ केल्यामुळे गुरुवारपासून ग्राहकांच्या दैनंदिन खर्चात वाढ होणार आहे. आधीच वाढत्या महागाईचा सामना करणाऱ्या कुटुंबांच्या मासिक बजेटवर या निर्णयाचा थेट परिणाम होणार आहे.


