(रत्नागिरी)
रत्नागिरी पोलिसांनी “मिशन शोध” अंतर्गत सन 2016 पासून बेपत्ता असलेल्या श्री. योगेश पुंडलिक खामकर याचा शोध लावला आहे. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील हरवलेल्या व बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात आला आहे.
पोलीस तपासानुसार, दिनांक 05 एप्रिल 2016 रोजी रत्नागिरी शहरातील कंदिल लॉज मध्ये आलेले श्री. योगेश खामकर रूम नंबर 208 मध्ये गेले आणि नंतर बाहेर गेल्यावर परत आले नाही. लॉजच्या मालकांनी परिसरात शोध घेतला तरी त्याचा काही ठावठिकाणा लागला नाही. यावरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात नापत्ता रजिस्टर क्रमांक 22/2016 नोंदवण्यात आला. यानंतर तपासिक अंमलदारांनी 2023 मध्ये मुंबईतील मिसिंग पर्सन ब्युरोशी पत्रव्यवहार केला. चौकशी दरम्यान नापत्ता इसम एस.बी.एस. नगर, कांदपाडा, दहीसर, पूर्व, मुंबई येथे दिसून आला. तांत्रिक विश्लेषणातून ही माहितीही मिळाली की, श्री. खामकर श्री. सखाराम गोरे यांच्या संपर्कात आहेत.
सखाराम गोरे यांच्याकडे तपास केला असता, नापत्ता इसम एम.आय.डी.सी, लोटे, ता. खेड, जि. रत्नागिरी येथील मैफिल हॉटेल मध्ये मॅनेजर म्हणून काम करत असल्याचे निष्पन्न झाले. 19 सप्टेंबर 2025 रोजी स्थानिक तपासिक अंमलदारांनी हॉटेलमध्ये तपास करून खात्री केली की, श्री. खामकर मागील एक वर्षापासून त्या हॉटेलमध्ये काम करत आहेत आणि सखाराम गोरे यांच्याकडे भाड्याने राहतात.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील व तपासिक अंमलदार प्रमोद कांबळे (पो.हवा/1248) यांनी केली आहे. या कामगिरीतून “मिशन शोध” अंतर्गत बेपत्ता व्यक्तींचा शोध लावण्याच्या उपक्रमाला यश मिळत असल्याचे दिसून येत आहे.

