(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील जे. के. फाईल ते गद्रे कंपनी या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर सध्या जीवघेण्या खड्ड्यांनी अक्षरशः कहर केला आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्त्याचे तळ्यासारखे स्वरूप निर्माण झाले होते. त्यानंतर माती व दगड टाकून केलेला तात्पुरता भराव आता पूर्णपणे उखडून गेला असून, पुन्हा एकदा खोल व धोकादायक खड्डे उघडे पडले आहेत.
दिवसरात्र वाहनांची सतत वर्दळ असलेल्या या मार्गावरून जाताना अचानक गाडी खड्ड्यात आदळल्यास वाहनचालकांना तीव्र दणका बसत असून, मान–कंबर दुखापतींचा धोका निर्माण झाला आहे. खड्ड्यांची खोली वाढल्याने विशेषतः रात्रीच्या अंधारात दुचाकीस्वारांना अपघाताचे थेट आमंत्रण मिळत आहे. हा रस्ता एमआयडीसी परिसरातील महत्त्वाचा दुवा मानला जातो. उद्योगांसाठी आणि शहरातील वाहतुकीसाठी अत्यावश्यक असलेल्या या मार्गाची अशी दयनीय अवस्था पाहता, उद्योगमंत्री याच जिल्ह्यातील असताना MIDC भागातील या रस्त्याकडे दुर्लक्ष का होत आहे? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.
या रस्त्यावर यापूर्वीही दगड–मातीची मलमपट्टी करण्यात आली होती मात्र काही दिवसांत मलमपट्टी उखडून रस्त्यावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. गाडी खड्ड्यात आदळली, की कंबरेचा मणक्याला चांगलाच दणका बसतो; पण याच रस्त्याची अवस्था पाहूनही जबाबदारीचे मणके ढिले न होणे, ही प्रशासनाची खासियत ठरत आहे. वाहनचालकांना खड्ड्यांमधील बसणारा दणका दररोजचा झाला असताना, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना खड्ड्यांचे दणके बसत नाही की ते इकडे खड्ड्यांमुळे फिरकत नाही, हा प्रश्न आता नागरिकांना सतावत आहे. रस्त्यावर लाली पावडर शिंपडून किंवा डांबर अर्धवट टाकून खड्डे बुजवण्याऐवजी, खड्ड्यांच्या भागात डांबरीकरण करून खड्डे कायमस्वरूपी भरावेत, अशी मागणी ये–जा करणारे वाहनचालक आता करत आहेत.

