(रत्नागिरी / प्रतिनिधी)
दिवाळीच्या रोषणाईत घराघरांत आनंदाचे दीप उजळत असताना, स्वतःचे घर नाही, जवळचे नातेवाईक नाहीत आणि सणाच्या दिवशी आपुलकीने विचारपूस करणारेही कोणी नाही, अशा निराधारांच्या आयुष्यात माणुसकीचा प्रकाश पेरण्याचा संवेदनशील उपक्रम रत्नागिरीतील संपर्क युनिक फाउंडेशनने राबविला. आठवडा बाजार परिसरातील नगर परिषदेच्या बेघर निवाऱ्यात वास्तव्यास असलेल्या २२ निराधार नागरिकांसोबत दिवाळी साजरी करत संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सणाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो वंचितांपर्यंत पोहोचविण्याचा सुंदर संदेश दिला. फराळ, स्नेहभोजन आणि आपुलकीच्या संवादातून साजऱ्या झालेल्या या दिवाळीने अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलविले, तर काहींचे डोळे कृतज्ञतेने पाणावले.
सण-उत्सवांचा खरा आनंद सामूहिकतेत आणि दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यात असतो, या भावनेतून या उपक्रमाची संकल्पना पुढे आली. संस्थेचे अध्यक्ष शकील गव्हाणकर यांच्या मनात बेघरांसोबत दिवाळी साजरी करण्याचा विचार आला. त्यांनी संस्थेचे सल्लागार सचिन शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आठवडा बाजार येथील नगर परिषदेच्या बेघर निवाऱ्यात जाऊन तेथील रहिवाशांसोबत दिवाळी साजरी करण्याचे निश्चित करण्यात आले. या निवाऱ्यात सध्या सात महिला आणि १५ पुरुष असे एकूण २२ निराधार नागरिक वास्तव्यास आहेत. या उपक्रमाच्या नियोजनासाठी संस्थेच्या सदस्यांनी तत्परतेने पुढाकार घेतला. फराळाची व्यवस्था करण्यासाठी सचिन शिंदे, युसुफ शिरगावकर, जमीर खलफे, इस्माईल नाकाडे आणि कांचन मालगुंडकर यांनी विशेष सहकार्य केले. तर ‘किचन एक्सप्रेस रत्नागिरी’च्या जैबा बंदरकर यांनी या सर्वांसाठी आपुलकीने शाकाहारी पुलावचे भोजन उपलब्ध करून दिले.
ठरल्याप्रमाणे सायंकाळी संपर्क युनिक फाउंडेशनचे सदस्य फराळ आणि भोजनाचे साहित्य घेऊन बेघर निवाऱ्यात पोहोचले. यावेळी अध्यक्ष शकील गव्हाणकर, कांचन मालगुंडकर, युसुफ शिरगावकर, इस्माईल नाकाडे, जमीर खलफे, आयान कोंडकरी आणि मंथन मालगुंडकर उपस्थित होते. निवाऱ्याच्या कार्यालयप्रमुख शिवानी पवार यांनी तेथील रहिवाशांची परिस्थिती आणि निवाऱ्याच्या व्यवस्थेबाबत सदस्यांना माहिती दिली. त्यानंतर सर्व २२ रहिवाशांना दिवाळीचा फराळ आणि स्नेहभोजनाचे वाटप करण्यात आले. मात्र, या उपक्रमाचे वैशिष्ट्य केवळ फराळ आणि भोजनापुरते मर्यादित राहिले नाही. कार्यकर्त्यांनी या निराधारांसोबत वेळ घालवला, त्यांच्या सुख-दुःखाच्या गोष्टी जाणून घेतल्या आणि संवादातून आपलेपणाची जाणीव करून दिली. सणाच्या दिवशी घराची, कुटुंबीयांची आणि नात्यांची आठवण मनात दाटून येत असताना अनपेक्षितपणे लाभलेला हा स्नेह अनेकांसाठी भावनिक ठरला. आपलीही कोणीतरी आस्थेने विचारपूस करणारी माणसे आहेत, या भावनेने काहींचे डोळे पाणावले. त्या अश्रूंमध्ये दुःखापेक्षा मिळालेल्या मायेची आणि आपुलकीची भावना अधिक होती.
संपर्क युनिक फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांना फिरोज कोंडकरी, नदीम शेख आणि आदिल शिरगावकर यांचे सातत्याने मोलाचे सहकार्य लाभत असते. या सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. समाजातील उपेक्षित घटकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित करत फाउंडेशनने यंदाच्या दिवाळीला सामाजिक बांधिलकीचा अर्थपूर्ण आयाम दिला. दिवाळीच्या दिव्यांचा प्रकाश काही तासांत मंदावेल; मात्र माणुसकीच्या नात्याने दिलेला आपुलकीचा आधार आणि सन्मानाची जाणीव दीर्घकाळ मनात राहील. बेघरांच्या चेहऱ्यावर फुललेले समाधानाचे हास्य हीच संपर्क युनिक फाउंडेशनसाठी यंदाच्या दिवाळीतील सर्वांत मोठी भेट ठरली.


