(गुहागर / वार्ताहर)
तालुक्यातील गोणवली-कळेवाडी येथे एका ६७ वर्षीय वृद्धाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी, ७ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. यशवंत महादेव कळे (वय ६७, रा. गोणवली-कळेवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना सकाळी ९.५० वाजण्याच्या सुमारास किंवा त्यापूर्वी घडल्याचे समोर आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत कळे यांनी गोणवली येथील आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. शेजारी राहणारे समीर सुरेश कामेरकर यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी यशवंत कळे हे मृतावस्थेत असल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यशवंत कळे यांनी आत्महत्या करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, या घटनेचा अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत.


