(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून विरुद्ध दिशेने आणि मोबाईलवर बोलत बेदरकारपणे दुचाकी चालविल्याने भाट्ये पोलीस चेकपोस्टच्या पुढील रस्त्यावर सरकारी बोलेरो आणि दुचाकी यांच्यात अपघात झाल्याची घटना १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार मिथिलेश प्रसाद मुरकर (वय २४, रा. मागलाड, ता. जि. रत्नागिरी) जखमी झाला असून, दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खलील नझीर कुरणे हे १९ ऑक्टोबर रोजी सरकारी बोलेरो वाहनातून (क्रमांक एमएच ०८ एएक्स ०४३३) साक्षीदारांसह पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यातील वार्षिक निरीक्षणाचे काम आटोपून रत्नागिरीकडे परत येत होते. सायंकाळी ७.३५ वाजण्याच्या सुमारास भाट्ये पोलीस चेकपोस्टच्या पुढील रस्त्यावर आले असता, समोरून येणाऱ्या अॅक्सेस दुचाकीची (क्रमांक एमएच ०८ बीडी १७१८) बोलेरोशी धडक झाली. दुचाकीस्वार मिथिलेश मुरकर हा मोबाईलवर बोलत वाहन चालवत होता. तसेच रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता विरुद्ध दिशेने अविचाराने आणि बेदरकारपणे वाहन चालविल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या धडकेत मुरकर जखमी झाला, तर दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.
या प्रकरणी फिर्यादी पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद तुकाराम कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मिथिलेश प्रसाद मुरकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ आणि १८४(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.


