(रत्नागिरी / प्रतिनिधी)
लोकसहभाग आणि एकजुटीच्या बळावर अशक्य वाटणारी कामेही शक्य होतात, याचे प्रत्यंतर सांगवे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा घडवून आणले आहे. गावातील सप्तलिंगी नदीच्या पुनर्जीवनासाठी हाती घेण्यात आलेल्या उपक्रमाचा दुसरा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला असून, या कामामुळे परिसरात समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
नदी पुनर्जीवनाच्या या महत्त्वपूर्ण मोहिमेत नाम फाउंडेशनच्या तांत्रिक आणि यांत्रिक मदतीचा मोठा वाटा ठरला. फाउंडेशनकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या पोकलॅन यंत्रसामग्रीमुळे कामाला गती मिळाली. या यंत्रांचे चालक आणि वाहक यांचा ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. हे कार्य एखाद्या व्यक्तीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण गावाच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. या उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले. विशेषतः समीर जानवलकर यांच्यासह देवदत्त शिवाजी शेलार, विश्वास गुलाबराव शेलार, देवेंद्र भास्कर शेलार, सरपंच दुर्वा शेलार, सदानंद गोपीनाथ शेलार, संजय लक्ष्मण शेलार, संजय काशीनाथ शेलार, विनय नारायण शेलार आणि भास्कर महादेव शेलार यांच्या सक्रिय सहभागामुळे कामाला अपेक्षित वेग मिळाला.
नदी पुनर्जीवनाच्या या उपक्रमासाठी आर्थिक मदत करणाऱ्या देणगीदारांप्रती ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली. विशेष म्हणजे मुंबईत स्थायिक असलेल्या गावकऱ्यांसह माहेरवाशिणींनीही मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक पाठबळ दिल्याचे सांगण्यात आले. दुसरा टप्पा पूर्ण झाला असला तरी पुनर्जीवनाची प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. तिसऱ्या टप्प्यात ‘उपाध्येचा गाळ’ काढणे आणि नदीपात्र पूर्णपणे स्वच्छ करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर असून, तेही लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. या उपक्रमाच्या माध्यमातून सांगवे गावाने सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव जपताना रत्नागिरी जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून पुन्हा एकदा आपली ओळख अधोरेखित केली आहे.

