(रत्नागिरी / प्रतिनिधी)
सार्वजनिक रस्ते म्हणजे पार्किंगची जागा नव्हे, असा स्पष्ट संदेश रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांना दिला आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होईल किंवा पादचाऱ्यांच्या जीवितास धोका पोहोचेल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ७ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल २२ वाहनचालकांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम २८५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
मुंबई-गोवा महामार्ग, बाजारपेठा, बसस्थानके तसेच शहरातील वर्दळीच्या मार्गांवर वाहने अस्ताव्यस्तपणे उभी करून वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे ‘दोन मिनिटांसाठी’ म्हणून रस्त्यावर वाहन सोडून जाणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. चिपळूण पोलिसांनी खेर्डी परिसरात कारवाई केली. बजाज शोरूमसमोर महामार्गावर वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी विकास संजय जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. खेर्डी बाजारपेठेसमोरील महामार्गावर वाहन उभे करणाऱ्या रफिक दाऊद मोटलानी याच्यावरही कारवाई करण्यात आली.
गुहागर-कराड मार्गावरील स्मार्ट बाजारसमोर वाहन बेदरकारपणे उभे करून निघून गेल्याप्रकरणी सौरभ संजय शिंदे, तर खेर्डी माळेवाडी येथील चामुंडा मार्बलसमोर सार्वजनिक रस्त्यावर वाहन उभे करून पसार झाल्याप्रकरणी विनोदकुमार रामेश्वर सिंग याच्यावर गुन्हा दाखल झाला. सावर्डे बाजारपेठेत मुंबई-गोवा महामार्गावर आयशर मालवाहू टेम्पो उभा करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मुकुंद विजय जोशी याच्यावर कारवाई करण्यात आली. वहाळगाव बाजारपेठेतील सर्व्हिस रोडवर प्रवासी मारुती इको अस्ताव्यस्तपणे उभी करणाऱ्या अजित रामचंद्र गमरे याच्यावरही गुन्हा दाखल झाला. संगमेश्वर एस.टी. बसस्थानकासमोरील सार्वजनिक रस्त्यावर टाटा मॅजिक टेम्पो उभा करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सुभाष गणपत पिंलणकर याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. लांजा पोलिसांनी सापुचेतळे-दोन आंबा मार्गावर सहा चाकी टाटा ट्रक अस्ताव्यस्त उभा करणाऱ्या संतोष बाबू भोजे याच्यावर कारवाई केली. खेडमधील भरणे नाका येथे मुंबई-गोवा महामार्गावर चारचाकी वाहन उभे करून रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी भावेश भास्कर मंडलीक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अलोरे-शिरगाव पोलिसांनी पेढांबे-कुंभारवाडी येथे हॉटेल निसर्गसमोरील मुख्य रस्त्यावर अवजड अशोक लेलँड वाहन उभे करणाऱ्या सुरेश शांतागौडा शाशनुर याच्यावर कारवाई केली. गुहागर पोलिसांनी शृंगारतळी पोलिस चौकीसमोरील गुहागर-चिपळूण मार्गावर दुचाकी उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी जहागिर मुंताज अली आलम याच्यावर गुन्हा नोंदविला.
रत्नागिरी शहरातही पोलिसांनी दोन वाहनचालकांवर कारवाई केली. सावरकर शिल्पासमोरील रस्त्यावर व्होक्सवॅगन ॲमिओ उभी करून रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सचिन दिलीप पाडळकर, तर धनजी नाका ते सावरकर चौक मार्गावर महिंद्रा एक्सयूव्ही उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राजीव कुमार विश्वेश्वर प्रसाद याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दापोली पोलिसांनीही सार्वजनिक रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंगविरोधात कारवाईचा धडाका लावला. बसस्थानकासमोर बोलेरो पिकअप रस्त्यावर उभी करून निघून गेल्याप्रकरणी संजय सुनील शिगवण, केळस्कर नाका येथे अर्टिगा कार उभी करून पसार झाल्याप्रकरणी अश्वेश अशोक कांबळे, मच्छिमार्केटसमोर अर्टिगा कार रस्त्यात सोडून गेल्याप्रकरणी महेश वामन जाधव आणि त्याच परिसरात टाटा इंट्रा मालवाहू टेम्पो उभा करून निघून गेल्याप्रकरणी जुबेर फारुख कुडुपकर यांच्यावर गुन्हे दाखल झाले.
रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी कारवांचीवाडी फाटा ते खेडशी मार्गावर सलग तीन कारवाया केल्या. दुचाकी उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी रघुनाथ उल्लेश खोत, चारचाकी वाहन उभे केल्याप्रकरणी दिनेश दिलीप शिंदे आणि दुचाकी अस्ताव्यस्तपणे लावून रहदारीस धोका निर्माण केल्याप्रकरणी नईम मुन्नावर पटेल यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. राजापूर पोलिसांनीही बंदरधक्का येथील सार्वजनिक शौचालयाजवळ गणेश घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुझुकी सुपर कॅरी वाहन उभे करून अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सादिक हम्मिद सागवेकर याच्यावर, तर महालक्ष्मी ज्वेलर्ससमोर प्रवासी रिक्षा रस्त्यात उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी विनायक दीपक चौगुले याच्यावर गुन्हा दाखल केला.
सार्वजनिक रस्त्यांवर मनमानी पद्धतीने वाहने उभी केल्याने केवळ वाहतूक कोंडी होत नाही, तर पादचारी, दुचाकीस्वार आणि इतर वाहनचालकांच्या सुरक्षिततेलाही का निर्माण होतो. विशेषतः महामार्ग, बाजारपेठा, बसस्थानके आणि वर्दळीच्या रस्त्यांवर अशा प्रकारचे पार्किंग गंभीर ठरू शकते. पोलिसांच्या या कारवाईतून सार्वजनिक रस्त्यांचा वापर मनमानी पार्किंगसाठी करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला असून, वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधातील ही कारवाई यापुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे.


