(चिपळूण /रत्नागिरी)
आंबा-काजूच्या बागेतील विहिरीत पडलेल्या दुर्मिळ पिसोरी हरणाची वन विभागाच्या बचाव पथकाने अथक प्रयत्नांनंतर सुरक्षित सुटका केली. वैद्यकीय आणि शारीरिक तपासणीत हरीण सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. वन विभागाच्या तत्परतेमुळे एका दुर्मिळ वन्यजीवाला जीवदान मिळाले आहे.
मार्गताम्हाणे खुर्द येथील सुतारवाडी परिसरात ७ नोव्हेंबर २०२६ रोजी ही घटना घडली. येथील रहिवासी प्रताप सुर्वे यांच्या मालकीच्या आंबा-काजूच्या बागेतील विहिरीत वन्यप्राणी पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबत चिपळूणचे वनपाल एस. एस. सावंत यांना माहिती दिली. माहिती मिळताच वन विभागाच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत अडकलेल्या प्राण्याची पाहणी केली असता, तो ससा नसून दुर्मिळ पिसोरी हरीण (माऊस डिअर) असल्याचे स्पष्ट झाले. या लहान आकाराच्या वन्यप्राण्याची सुरक्षित सुटका करण्यासाठी बचाव पथकाने प्रयत्न सुरू केले. दरम्यान, पिसोरी हरणाने विहिरीतील पाण्यात उडी घेत पोहण्यास सुरुवात केली. अशा परिस्थितीत बचाव पथकाने सावधगिरीने जाळ्याच्या साहाय्याने त्याला सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर पिंजऱ्यात ठेवून त्याची वैद्यकीय तसेच शारीरिक स्थिती तपासण्यात आली. हरीण सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
हे बचावकार्य विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या मोहिमेत वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक राहुल गुंठे, वनरक्षक कृष्णा इरमले आणि आरआरटी पथकाचे सदस्य अथर्व घाग यांनी सहभाग घेतला. वन विभागाच्या पथकाने दाखविलेली तत्परता आणि कौशल्य यामुळे दुर्मिळ वन्यजीवाचे प्राण वाचले आहे.


