(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर शासकीय विश्रामगृहासमोरील संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. पावसाळ्यात समुद्राला आलेल्या उधाणामुळे जोरदार लाटांचा तडाखा बसून या भिंतीचा भाग ढासळला आहे. परिणामी, समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, विशेषतः वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांना या ठिकाणाहून ये-जा करणे कठीण बनले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मेरीटाईम बोर्ड अर्थात बंदर खात्याने तातडीने लक्ष घालून संरक्षण भिंतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर सुमारे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी मेरीटाईम बोर्डामार्फत पर्यटकांच्या सोयीसाठी पायऱ्यांची संरक्षण भिंत उभारण्यात आली होती. पर्यटकांना या पायऱ्यांवर बसून अथांग पसरलेल्या निळ्याशार समुद्राचे सौंदर्य न्याहाळता यावे, तसेच सायंकाळच्या वेळी नयनरम्य सूर्यास्ताचा आनंद घेता यावा, हा या बांधकामामागील उद्देश होता. या भिंतीमुळे पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर उतरण्यासाठीही सोयीचा मार्ग उपलब्ध झाला होता.
शासकीय विश्रामगृहापासून मंदिराच्या दिशेने समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी या पायऱ्यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. मात्र, गेल्या चार ते पाच वर्षांपासून समुद्राच्या जोरदार लाटांच्या माऱ्यामुळे संरक्षण भिंतीचा काही भाग टप्प्याटप्प्याने कोसळत आहे. सध्या या भिंतीचा तुटलेला भाग पर्यटकांसाठी अडथळा ठरत असून, समुद्रकिनाऱ्यावर जाणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः वृद्ध पर्यटक आणि लहान मुलांना या ठिकाणी ये-जा करताना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. गणपतीपुळे येथे दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. अशा परिस्थितीत समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी उपयुक्त असलेल्या या मार्गाची झालेली दुरवस्था पर्यटनाच्या दृष्टीनेही गैरसोयीची ठरत आहे.
त्यामुळे मेरीटाईम बोर्डाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करून संरक्षण भिंतीच्या तुटलेल्या भागाची तातडीने दुरुस्ती करावी किंवा आवश्यकतेनुसार नव्याने भिंतीचे बांधकाम करावे, अशी मागणी गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील व्यावसायिक, स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांकडून करण्यात येत आहे. जागतिक कीर्तीच्या पर्यटनस्थळावरील पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी संबंधित विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


