(रत्नागिरी / वार्ताहर)
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन रत्नागिरी केंद्रावर करण्यात आले आहे. १६ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२६ या कालावधीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे या स्पर्धेतील एकूण २१ नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. दररोज सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या या नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून रत्नागिरीकरांना विविध विषय, आशय आणि कलाविष्कारांनी समृद्ध अशा नाटकांची मेजवानी अनुभवता येणार आहे.
या स्पर्धेचा प्रारंभ सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी ‘मेला तो शेवटचा होता’ या नाटकाने होणार आहे. त्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी ‘व्हायरल आजोबा’, १९ नोव्हेंबर रोजी ‘लाईफलाईन’, २० नोव्हेंबर रोजी ‘पितामह उवाच’, २१ नोव्हेंबर रोजी ‘प्रिय आईस’ आणि २२ नोव्हेंबर रोजी ‘ब्लेम ट्रॅप अँड गेम’ ही नाटके सादर केली जातील.
२३ नोव्हेंबर रोजी ‘अॅन एनिमी ऑफ द पिपल’, २५ नोव्हेंबर रोजी ‘वॉरंट’, २६ नोव्हेंबर रोजी ‘चांदणी’, २७ नोव्हेंबर रोजी ‘स्मृतिगंध’, २८ नोव्हेंबर रोजी ‘स्वप्नपंख’ आणि २९ नोव्हेंबर रोजी ‘Exception 375’ या नाटकांचे प्रयोग होणार आहेत.
३० नोव्हेंबर रोजी ‘षडयंत्र’, १ डिसेंबर रोजी ‘अंधारवाटा’, २ डिसेंबर रोजी ‘सूर राहू दे’, ४ डिसेंबर रोजी ‘देवायतनम कुले जन्म’, ५ डिसेंबर रोजी ‘दि अनॉनिमस’, ६ डिसेंबर रोजी ‘शेवंताजिती हाय’, ७ डिसेंबर रोजी ‘करायला गेलो एक आणि’, ८ डिसेंबर रोजी ‘फक्त एकदा वळून बघ’ आणि ९ डिसेंबर रोजी ‘तिचे संदर्भ नसलेली गोष्ट’ या नाटकाने स्पर्धेची सांगता होणार आहे.
या स्पर्धेमध्ये विविध नाट्यसंस्थांमधील कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक आपली कलात्मक प्रतिभा सादर करणार आहेत. सामाजिक, कौटुंबिक, मानवी नातेसंबंध आणि विविध विषयांवरील नाट्यप्रयोगांमधून हौशी रंगभूमीवरील नव्या कलावंतांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. नाट्यरसिकांसाठीही वेगवेगळ्या आशय-विषयांची नाटके एकाच व्यासपीठावर अनुभवण्याची ही पर्वणी ठरणार आहे.
या स्पर्धेचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत संगीत केळसकर यांच्या नियोजनाखाली ही स्पर्धा पार पडणार आहे. नाट्यप्रयोगांसाठी तिकिटांचे दर १५ रुपये आणि १० रुपये असे निश्चित करण्यात आले आहेत.
रत्नागिरीतील नाट्यरसिकांनी १६ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात होणाऱ्या या नाट्यप्रयोगांना उपस्थित राहून हौशी रंगभूमीवरील कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


