(संगमेश्वर / एजाज पटेल)
शास्त्रीपूल-डिंगणी मार्गावर गॅस पाइपलाईन भूमिगत टाकण्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विकासकामाच्या नावाखाली मुख्य रस्त्याची झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेले माती-दगडांचे ढिगारे, उघड्या चाऱ्या आणि वाहतुकीसाठी अपुरी जागा यामुळे या मार्गावरील प्रवास धोकादायक बनला आहे. दोन दिवसांपूर्वी याच मार्गावर माती-दगडांच्या ढिगाऱ्यावर दुचाकीस्वार कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने तो थोडक्यात बचावला. या घटनेमुळे ठेकेदाराच्या कामातील निष्काळजीपणा आणि संबंधित प्रशासनाच्या देखरेखीचा अभाव पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास एक दुचाकीस्वार या मार्गावरून प्रवास करत असताना समोरून येणाऱ्या मोठ्या वाहनाच्या प्रखर प्रकाशझोतात त्याला रस्त्याचा अंदाज घेणे कठीण झाले. समोरच्या वाहनाला बाजू देण्यासाठी त्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, खोदकामातून बाहेर काढून रस्त्यालगत टाकलेल्या माती-दगडांच्या ढिगाऱ्यावर दुचाकी आदळल्याने तो थेट ढिगाऱ्यावर कोसळला. बाजूलाच खोदून ठेवलेली उघडी चारी असल्याने या अपघातात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. सुदैवाने दुचाकीस्वार बचावला. मात्र, अशा धोकादायक परिस्थितीतून नागरिकांना रोज प्रवास करावा लागत असल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पाइपलाईनच्या कामासाठी रस्ता खोदण्यात आल्यापासून या मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्याची रुंदी कमी होणे, ठिकठिकाणी साचलेले माती-दगडांचे ढिगारे आणि समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसणे, यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहनांना मार्ग देण्यावरून वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये वादावादीचे प्रसंगही घडत असल्याची चर्चा आहे. कामाचा वेग आणि नियोजनाबाबत ठेकेदाराकडून नागरिकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप स्थानिकांकडून केले जात आहेत.
या मार्गाची अवस्था पावसाळ्यात आणखी बिकट होते. अवघ्या तासाभराच्या पावसाने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. काही ठिकाणी एक ते दोन फूट खोल चिखल साचत असल्याने दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना मार्ग काढणेही कठीण बनते. वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता, प्रवासासाठी लागणारा अतिरिक्त वेळ, इंधनाचा अपव्यय आणि अपघातांचा वाढता धोका अशा अनेक समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. रुग्ण, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच रोजंदारीसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय अधिकच वाढली आहे. खासगी ठेकेदाराच्या कामामुळे सर्वसामान्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असताना त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, सार्वजनिक रस्त्यावर सुरू असलेल्या या कामाला नेमकी किती कालमर्यादा देण्यात आली आहे, याबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महत्त्वाच्या मार्गावर तीन वर्षांपासून काम सुरू असताना संबंधित विभागाने त्याच्या प्रगतीचा किती वेळा आढावा घेतला? निर्धारित मुदतीत काम पूर्ण न झाल्यास ठेकेदारावर कोणती कारवाई केली जाणार? खोदकाम सुरू असताना वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी बॅरिकेट्स, सूचना फलक, रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे नियम पाळले जात आहेत की नाही, याची संबंधित विभागाकडून नियमित पाहणी होते का? रस्त्यावर टाकलेले माती-दगडांचे ढिगारे हटविण्याबरोबरच उघड्या चाऱ्या सुरक्षित करण्याबाबत ठेकेदाराला सूचना देण्यात आल्या आहेत का? अपघातांचा धोका आणि नागरिकांच्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचूनही परिस्थितीत सुधारणा का होत नाही, असे सवाल स्थानिक नागरिकांकडून केले जात आहेत. केवळ कागदोपत्री देखरेख न ठेवता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
संबंधित प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून शास्त्रीपूल-डिंगणी मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित आणि सुस्थितीत करावा, रखडलेल्या पाइपलाईनच्या कामासाठी ठेकेदाराला अंतिम मुदत निश्चित करून द्यावी, धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात आणि झालेल्या निष्काळजीपणाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पाइपलाईन भूमिगत टाकण्याच्या कामासाठी रस्ता खोदून ठेवायचा, माती-दगडांचे ढिगारे तसेच सोडायचे आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करण्यास भाग पाडायचे, हाच विकासकामांचा उद्देश आहे का? दोन दिवसांपूर्वी दुचाकीस्वार थोडक्यात बचावला; मात्र भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तीन वर्षांपासून रखडलेल्या या कामाला पूर्णत्वाची निश्चित तारीख कधी मिळणार आणि ठेकेदाराच्या मनमानीला प्रशासन कधी लगाम घालणार, याकडे शास्त्रीपूल-डिंगणी मार्गावरील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


