(रत्नागिरी / वार्ताहर)
दिवाळीचा आनंद समाजातील निराधार आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचावा, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक असोसिएशनच्या वतीने लांजा येथील ‘आजी-आजोबांचे गाव’ येथे विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना विविध दिवाळी भेटवस्तूंचे वाटप करून मेकॅनिक बांधवांनी माणुसकीची दिवाळी साजरी केली.
स्वतःच्या कष्टातून आणि प्रामाणिक व्यवसायातून उपजीविका करणाऱ्या मेकॅनिक बांधवांनी सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवत या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसाठी दिवाळीचा फराळ, मोती साबण, उटणे, पावडर, सुवासिक तेल, खोबरेल तेल, अत्तर, खाऊ, पणत्या, गोड मिठाईचे बॉक्स, टॉवेल, बेडशीट आणि उशी कव्हर्स अशा विविध वस्तू भेट देण्यात आल्या. याशिवाय आकाशकंदील, बल्ब, वायर, होल्डर आणि टू-पिन यांसारखे उपयुक्त साहित्यही वृद्धाश्रमाला सुपूर्द करण्यात आले.
दिवाळीचा खरा आनंद केवळ आपल्या घरात दिवे लावण्यात नसून, इतरांच्या आयुष्यातही आनंदाचा प्रकाश निर्माण करण्यात आहे, अशी भावना यावेळी संयोजकांनी व्यक्त केली. आजी-आजोबांच्या चेहऱ्यावरील समाधान, त्यांच्या डोळ्यांतील आनंद आणि त्यांना मिळालेली आपुलकी हीच या उपक्रमात सहभागी झालेल्या मेकॅनिक बांधवांसाठी सर्वात मोठी भेट असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रत्नागिरीतील प्रसिद्ध वेल्डर महेंद्र शेरवे, सामाजिक कार्यकर्ते मयुरेश भितळे, प्रसिद्ध मेकॅनिक श्रीधर चोपडे, असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष फैयाज खतीब, पावस विभाग असोसिएशनचे अध्यक्ष महेश पालकर, लांजा येथील प्रसिद्ध मेकॅनिक तथा असोसिएशनचे उपाध्यक्ष मिलिंद पवार, असोसिएशनचे सचिव तथा रत्नागिरी तालुका मेकॅनिक असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय कदम, जिल्हासंघटक पारसशेठ खानविलकर, ज्येष्ठ मेकॅनिक नितीनशेठ गुरव, संभाजी गेजगे, अनिल सुतार, सुरेश माळी, भावेश माचिवले, समीर शेट्ये, प्रदीप रेवाळे, अक्षय लोंढे, दिलीप शिंदे आणि गणेश शेंडे यांनी योगदान दिले. तसेच सामाजिक कार्यकर्ते राहुल पेडणेकर व हैरी हरचिरकर यांनीही आर्थिक सहकार्य आणि सक्रिय सहभाग नोंदवला.
स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आत्मनिर्भरपणे काम करणाऱ्या मेकॅनिक बांधवांनी आपल्या कष्टाच्या कमाईतील काही हिस्सा समाजातील गरजू घटकांसाठी खर्च करून सामाजिक बांधिलकी जपली. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार निराधार आणि वंचितांच्या आनंदात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी एकता मेकॅनिक असोसिएशनच्या वतीने करण्यात आले.


