(लांजा /रत्नागिरी प्रतिनिधी)
शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गालगत गटारांच्या कडेला करण्यात आलेल्या अतिक्रमणांविरोधात प्रशासनाने अखेर धडक कारवाई सुरू केली असून, गटारापासून पाच फूट अंतराच्या आत असलेली अतिक्रमणे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. जेसीबीच्या सहाय्याने सुरू असलेल्या या मोहिमेमुळे महामार्ग परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
यापूर्वी संबंधित व्यावसायिकांना राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. गटारालगत उभारण्यात आलेल्या शेड, पायऱ्या, तात्पुरती बांधकामे तसेच विविध अतिक्रमणांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार होती. त्यानंतर प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाईचा बडगा उगारला. कारवाईदरम्यान काही ठिकाणी व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याने वातावरण काही काळ तापल्याचे पाहायला मिळाले. मात्र, पोलिस बंदोबस्ताच्या उपस्थितीत कारवाई सुरू ठेवण्यात आली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने दक्षता घेतली होती.
राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि लांजा नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. कारवाईवेळी संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. या मोहिमेमुळे महामार्गालगतची जागा मोकळी होण्यास मदत होणार असून, गटारे स्वच्छ आणि प्रवाही ठेवण्याचा प्रशासनाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागण्यासही या कारवाईचा फायदा होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
कारवाईदरम्यान नगरपंचायतीच्या कर निर्धारक गीतांजली नाईक, स्वच्छता विभाग कर्मचारी संजय गुरव, कर विभाग लिपिक संतोष आग्रे, निलकंठ बगळे यांच्यासह महामार्ग विभागाचे अभियंते, अधिकारी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

