(लांजा / प्रतिनिधी)
पोलीस दलात उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवा बजावल्याबद्दल ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ प्राप्त लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे तसेच पोलीस हवालदार आशिष वसंत शेलार यांचा सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत मिळालेल्या या सन्मानाबद्दल दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांच्या कार्याला समाजाकडून मिळणारी अशी दाद त्यांच्या कर्तव्याला अधिक बळ देणारी ठरते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी सुरेश करमळे, दिनेश कांबळे, अनिरुद्ध कांबळे, संजय रेवाळे, भारत कांबळे, राजन देसाई, अशोक गुरव, विजय कुरूप आणि मुरली तेंडुलकर यांनी एकत्रितपणे अधिकारी व अंमलदारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. अति उत्कृष्ट सेवा पदकाने गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.

