( लांजा )
लांजा तालुक्यातील आरगाव बौद्धवाडी येथे घराशेजारी चिऱ्याचा बांध बांधण्याचे काम सुरू असताना पावसामुळे बांध कोसळून त्याखाली दबलेल्या मजूर महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी (२२ जून) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. कल्पना कमलाकर यद्रे (वय ३९, रा. आरगाव, कुणणेगाव) या आरगाव बौद्धवाडी येथील मुकुंद कदम यांच्या घरी मजुरीचे काम करत होत्या. घराशेजारी चिऱ्याचा बांध बांधण्याचे काम सुरू असून त्या मातीचा भराव टाकत होत्या.
दरम्यान, सायंकाळी अचानक पावसाला सुरुवात झाल्यानंतर चिऱ्याचा बांध कोसळला. या दुर्घटनेत कल्पना यद्रे या बांधाखाली दबून गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी लांजा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना रात्री सुमारे ७.४५ वाजता त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही. डी. जाधव अधिक तपास करत आहेत.

