(देवळे / प्रकाश चाळके)
महाराष्ट्र नेव्हल एनसीसी युनिट, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १० दिवसीय ‘कोकण ज्ञान तरंग’ या सागरी मोहिमेत देवरुख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या पाच जणांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्रातील ६० एनसीसी छात्रांनी शिडाच्या बोटींच्या साहाय्याने रत्नागिरी ते पालशेत आणि पुन्हा रत्नागिरी असा सुमारे २५० किलोमीटरचा सागरी प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. सागरी नौकावहन कौशल्य विकसित करणे, छात्रांमध्ये साहसी वृत्ती निर्माण करणे आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचवणे, या उद्देशाने प्रजासत्ताक दिन २०२७ च्या पार्श्वभूमीवर या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
या मोहिमेसाठी मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील एकूण १२० एनसीसी कॅडेट्सनी पूर्वप्रशिक्षण घेतले होते. या प्रशिक्षणात सागरी नौकावहन, रोईंग आणि दर्यावर्दी कौशल्यांचे विशेष धडे देण्यात आले. समुद्रातील बदलत्या परिस्थितीला सामोरे जाताना आवश्यक असणारी शिस्त, समन्वय आणि निर्णयक्षमता विकसित करण्यावरही भर देण्यात आला. दहा दिवसांच्या खडतर पूर्वप्रशिक्षणानंतर ६० छात्रांची ‘व्हेलर सेलिंग एक्स्पेडिशन (मेन्यू-२७)’ साठी निवड करण्यात आली. निवड झालेल्या कॅडेट्सनी २७ फूट लांबीच्या डिके प्रकारातील बोटींच्या माध्यमातून हा सागरी प्रवास पूर्ण केला.
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील कॅडेट कॅप्टन केतन रोशन कदम (तृतीय वर्ष, संगणक विज्ञान), कॅडेट यश संदीप कानार (तृतीय वर्ष, वाणिज्य), कॅडेट शुभम सुजित चव्हाण (द्वितीय वर्ष, वाणिज्य), कॅडेट ज्ञानल संजय धामणसकर (द्वितीय वर्ष, संगणक विज्ञान) आणि ए. एन. ओ. सब लेफ्टनंट प्रा. उदय भाट्ये यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. यापूर्वी १० ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित ‘प्री-मेनू कॅम्प : २७’ मध्येही महाविद्यालयाचे नऊ कॅडेट्स सहभागी झाले होते.
या मोहिमेत कॅडेट कॅप्टन केतन कदम हे सीनियर एस.डी. म्हणून सहभागी असलेल्या बोट क्रमांक ११ ला ‘बेस्ट व्हेलर टीम’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या बोटीच्या पथकाला प्रशिक्षक पी. आई. स्टाफ अभिषेक अग्रहारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मोहिमेच्या समारोप कार्यक्रमाला एनसीसी ग्रुप मुख्यालय, कोल्हापूरचे डेप्युटी ग्रुप कमांडर कर्नल अनुप उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सहभागी नेव्हल कॅडेट्स, प्रशिक्षक आणि मुख्य सेलिंग टीमचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल तसेच शून्य अपघातांसह (झिरो इन्सिडेंट) मोहीम यशस्वी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
‘ज्ञानाच्या लाटा, प्रगतीच्या वाटा’ हे या मोहिमेचे ब्रीदवाक्य होते. सागरी प्रवासाच्या माध्यमातून कॅडेट्समध्ये शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या मोहिमेमुळे कॅडेट्सना सागरी जैवविविधता, खारफुटीचे पर्यावरणीय महत्त्व आणि निसर्ग संवर्धनाची गरज याविषयीही माहिती मिळाली.
‘कोकण ज्ञान तरंग’ संकल्पनेअंतर्गत नौकानयन मोहिमेसोबतच विविध सामाजिक बांधिलकीचे उपक्रमही राबविण्यात आले. मालगुंड, वरवडे, तवसाळ, वेळणेश्वर, गुहागर आणि जयगड या प्रमुख बंदरांवर तसेच किनारपट्टीवरील विविध ठिकाणी कॅडेट्सनी पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती केली. युवा सक्षमीकरण, मुलगी वाचवा-मुलगी शिकवा, समुद्र संरक्षण आणि संरक्षण क्षेत्रातील कारकीर्द मार्गदर्शन अशा विषयांवर प्रभावीपणे माहिती देण्यात आली. या उपक्रमांतून सुमारे २,८०० नागरिकांशी संवाद साधण्यात आला.
भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, नागरी प्रशासन, बंदर प्राधिकरण आणि स्थानिक शिक्षण संस्था यांच्या समन्वयातून २५० किलोमीटरचा हा सागरी प्रवास कोणत्याही सुरक्षा धोक्याविना सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण झाला. कोल्हापूर येथील एनसीसी ग्रुप मुख्यालय आणि महाराष्ट्र डायरेक्टरेट यांच्या मार्गदर्शनाखाली २ महाराष्ट्र नेव्हल युनिटच्या ‘मोस्ट एंटरप्रायझिंग नेव्हल युनिट (मेन्यू २७)’ या खुल्या समुद्रातील नौकानयन मोहिमेची यशस्वी सांगता झाली.
या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व कॅडेट्स आणि मार्गदर्शकांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
फोटो : सागरी मोहिमेसाठी महाविद्यालयातून सहभागी झालेले एनसीसी कॅडेट्स व एएनओ.


